सेंद्रिय शेती, पूरक व्यवसाय : राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी आज ऑनलाईन प्रशिक्षण

 राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा 'उमेद' अभियान पुढे आले आहे.  

Updated: Jul 4, 2020, 08:07 AM IST
सेंद्रिय शेती, पूरक व्यवसाय : राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी आज ऑनलाईन प्रशिक्षण title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा 'उमेद' अभियान पुढे आले आहे. गावागावातील माळरानावर राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांची जीवनोन्नती साधण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. यासाठी राज्यात प्रथमच महिला शेतकऱ्यांकरिता ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 

सुमारे साडेचौदा लाख महिला शेतकरी या ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतील. खरीप हंगामातील सेंद्रीय शेती, एकत्रित शेती अशा विविध विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षणामध्ये चर्चा होणार आहे. आज शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून हे प्रशिक्षण सुरु होईल. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कृषी विभाग आणि उमेद अभियानामार्फत या ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणात parthlive.com  या संकेतस्थळावरुन तसेच उमेद अभियानाच्या mission umed या युट्यूब चॅनेलवरुन सहभागी होता येईल. या प्रशिक्षणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे मार्गदर्शन करणार आहेत.

महिला शेतकऱ्यांचे काम मर्यादित न राहता त्यांना शेतीतील अत्याधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान, शेळीपालन, कुकुटपालन आदी शेतीपूरक व्यवसाय, सेंद्रीय शेतीचे महत्व, एकत्रित शेती अशा विविध विषयांची माहिती व्हावी यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. शिवाय हे प्रशिक्षण ऑनलाईन असल्याने डिजिटल तंत्राचा वापर कसा करावा याची प्राथमिक माहितीही यानिमित्ताने महिला शेतकऱ्यांना होणार आहे.

राज्यातील सुमारे १४ लाख ४८ हजार महिला शेतकरी या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. सध्या पावसाळा सुरु झाल्याने खरीपाची कामे वेगात सुरु आहेत. पण त्याचवेळी कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता येत नाही. त्यामुळेच 'उमेद' अभियानामार्फत या ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यानिमित्ताने महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षणाबरोबरच डिजिटल तंत्रज्ञानाशीही संलग्न होता येणार आहे. प्रशिक्षणात अधिकाधिक महिला शेतकरी आणि त्याचबरोबर पुरुष शेतकऱ्यांनीही सहभाग घ्यावा आणि तज्ज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  आर. विमला यांनी केले आहे.