मुंबई : लोकांना हवं असलेल्या लोकल रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी (Mumbai Local Time Table) चर्चा केली आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतही आम्ही याबाबत चर्चा करू अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच लोकलच्या वेळा बदलण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा राजेश टोपेंनी व्यक्त केली आहे. सध्या सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलमधून प्रवासाला बंदी आहे. त्यामुळं या वेळा बदलण्याची मागणी मुंबईकारंची आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीय. सर्वसामान्यांचा हा लोकल प्रवास सुरु झाल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसत नाहीय. या पार्श्वभुमीवर प्रवास खुला करण्याचा पुढचा टप्पा लवकरच जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवास मुभा कधी देणार ? हा प्रश्न विचारला जातोय. यावर माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिलीय.
15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या मुंबई उपनगर आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी नाहीय. आता हळुहळू सर्व सुरळीत होत असताना लोकल प्रवास देखील पुर्ववत व्हावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलीय.
तसेच महाविद्यालयाच्या वेळा गृहीत धरता ठराविक वेळेसाठी परवानगी न देता पूर्ण दिवस लोकल प्रवास खुला करवा असेही विद्यार्थ्यांनी म्हटलंय. दरम्यान, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार येईल असे उदय सामंत म्हणाले.