आता लढायचं नाही जिंकायचंय! नगरसवेकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांचा निर्धार

शिवसेनेचे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, काऊंटर प्लॅनिंग सुरू 

Updated: Jun 24, 2022, 10:12 PM IST
आता लढायचं नाही जिंकायचंय! नगरसवेकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांचा निर्धार title=

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) दोन तृतियांश आमदार फोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदाला आणि नेतृत्वालाच जोरदार हादरा दिलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे ते म्हणजे शिवसेना पक्षसंघटना ताब्यात घेण्याचं. त्यादृष्टीनं राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्यांना फोडण्याची तयारी एकनाथ शिंदेंनी चालवली आहे. 

शिवसेनेच्या राज्यातल्या तब्बल 400 नगरसेवकांची यादी शिंदे गटानं तयार केलीय. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, वसई विरार, पनवेल उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक महापालिकेतले हे नगरसेवक आहेत.

या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनंही डॅमेज कंट्रोलला सुरवात केली आहे. शिवसेनेने विभानप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांच्या बैठकीला संभोधन करत आता लढायचं नाही तर जिंकायचं असा निर्धार केला आहे. या बैठकीला शिवसेनेचे राज्यभरातले नगरसेवक ऑनलाईन उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर शिवसैनिक नव्या दमाने, नव्या जोशाने रस्त्यावर उतरत आहेत. आम्हाला ठिकठिकाणी लोकं भेटतायत, व्हॉट्सअॅप येतायत,  फेसबूकवर मेसेज येतायत, ट्विट्स येतायत की शिवसेनेसाठी आम्ही पुन्हा लढायला तयार आहोत. जिंकायचं म्हणजे जिंकायचंच हा निर्धार करुन शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

जे आमदार गुवाहाटीत किंवा कुठे असतील, त्यातले 50 टक्के आमदार असे आहेत जे अजूनही आपल्यासोबत आहेत. अनेक आमदारांना कैदी बनवून नेण्यात आलं. एकजुटीने आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर उभं रहायचं आहे. 

ही लढाई कशी पुढे जाईल याचं आपल्याला सध्या काहीच माहित नाही. दोन तीन आठवड्यांपूर्वी कुरबूर होती, तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर समोर येऊन सांगा तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो. काही चार पाच लोकांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत त्यांनी हे पाऊल उचललं आहे. 

ताठ मानाने जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्यासमोर पर्याय आहे शिवसेनेमध्ये राहून शिवसेना पुन्हा बांधायचं, जे काही आमदार तिथे कैदी म्हणून आहेत त्यांना आपल्यात पुन्हा घेऊन पक्ष पुढे घेऊन जायचं. तिथे काही आमदार आहेत ते फोन करुन सांगतायत आम्हाला परत यायचं आहे.

जर काही रुसवे फुगवे असतील त्याबद्दल महाराष्ट्रात राहुन सांगितलं असतं आसाम किंवा गुजरातला जाऊन बंड काय करायचं. असो पण इथून पुढे आपल्याला लढत जायचं आहे आणि जिंकत जायचं आहे. हा लढा खूप मोठा जरी असला तरी जिंकण्यासारखा आहे असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केला आहे.