मुंबई: एटीसने अटक केलेल्या वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ तो राहत असलेल्या सोपारा गावातील, भंडार आळी परिसरातील लोक येत्या शुक्रवारी १७ ऑगस्ट रोजी नालासोपारा मध्ये मोर्चा काढणार आहेत. एटीसने केलेली कारवाई चुकीची आहे, त्याला कट रचून गोवण्यात आल्याचा आरोप गावातील मित्रपरिवाराने केला आहे. आणि या विरोधात हा मोर्चा निघणार असल्याच म्हटलं आहे.
सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यात डहाणू ते अलिबाग पर्यंतचे सर्व भंडारी समाज तसेच काही हिंदुत्ववादी संघटना ही सामील होणार असल्याच सांगण्यात आलं आहे. आज गावक-यांची सोपारा गावात अनंत सभागृहात मिटिंग होती त्यावेळी गावक-यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी कर्नाटक एसआयटीचं एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. नालासोपाऱ्यातून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करण्यासाठी हे पथक मुंबईत आल्याचं सूत्रांनी म्हटलंय. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीनं काही आरोपींना अटक केली आहे. त्या आरोपींच्या डायऱ्यांमध्ये वैभव राऊत आणि त्याच्या साथीदारांची नावं असल्याचं उघडं झालं आहे. त्यातूनच गौरी लंकेश यांच्या हत्येशी वैभव राऊतचा संबंध तपासण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत आले.