मुंबई : राज्याच्या ३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायती आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी उद्या मंगळवारी २१ डिसेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा वगळून उर्वरित जागांसाठी उद्या निवडणूक होत आहे.
विशेष म्हणजे १०५ पैकी रायगड - पाली, पुणे - देहू, जालना - तीर्थपुरी आणि सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर, वैराग, नातेपुते या ६ नगरपंचायती नवनिर्मित आहेत.
स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहे. या जागांसाठी १८ जानेवारी २०२२ ला मतदान होणार आहे. या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता आहे. ही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ जागा असून येथे काँग्रेस आणि भाजपची सत्ता आहे. गत निवडणुकीत येथे राष्ट्रवादीला सर्वाधिक २० जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजप (१७) आणि काँग्रेस (१६) यांनी युती करून राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवले होते. याचा वचपा या निवडणुकीत काढणार का? याचे उत्तर उद्या मतदान पेटीत बंद होणार आहे.
निवडणूक होणाऱ्या नगरपंचायती
१) ठाणे - (२) मुरबाड, शहापूर
२) पालघर - (३) तलासरी, विक्रमगड, मोखाडा
३) रायगड - (०६) खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)
४) रत्नागिरी - (०२) मंडणगड, दापोली
५) सिंधुदुर्ग - (०३) दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ
६) पुणे - (०१) देहू (नवनिर्मित)
७) सातारा - (०६) लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी
८) सांगली - (०३) कडेगाव, खानापूर, कवठे-महांकाळ,
९) सोलापूर - (०५) माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)
१०) नाशिक - (०५) निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा
११) धुळे - (०१) साक्री
१२) नंदुरबार - (०१) धडगाव
१३) अहमदनगर - (०४) अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी
१४) जळगाव - (०१) बोदवड
१५) औरंगाबाद – (०१) सोयगाव
१६) जालना - (०५) बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)
१७) परभणी - (०१) पालम
१८) बीड - (०५) केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी
१९) लातूर - (०४) जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ
२०) उस्मानाबाद - (०२) वाशी, लोहारा
२१) नांदेड - (०३) नायगाव, अर्धापूर, माहूर
२२) हिंगोली - (०२) सेनगाव, औंढा-नागनाथ
२३) अमरावती - (०२) भातकुली, तिवसा
२४) बुलडाणा - (०२) संग्रामपूर, मोताळा,
२५) यवतमाळ – (०६) महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी
२६) वाशीम - (०१) मानोरा
२७) नागपूर – (०२) हिंगणा, कुही
२८) वर्धा – (०४) कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर
२९) भंडारा – (०३) मोहाडी, लाखनी, लाखांदूर
३०) गोंदिया - (०४) सडकअर्जुनी, मोरगावअर्जुनी, देवरी, सावली
३१) चंद्रपूर - (०६) पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा
३२) गडचिरोली - (०८) एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, भामरागड