मुंबई : जनतेला वेगवान प्रवासाचे स्वप्न दाखवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे बुलेट ट्रेन. भाजप सरकार या बुलेट ट्रेनच्या कौतूकाचे तुणतुणे कितीही वाजवत असले तरी, ही ट्रेन काही सर्वसामान्यांना परवडेल असे चित्र सध्यातरी दिसत नाही. सांगितले जात आहे की, ठाणे ते बांद्रा-कुर्ला संकुला पर्यंत (बीकेसी) बुलेट ट्रेनमधून प्रवासासाठी तब्बल २५० रूपये मोजावे लागू शकतात. महत्त्वाचे म्हणजे हे प्रवासभाडे केवळ एकेरी प्रवासाचे आहे.
पंतप्रधान मोदींनी देशाला विकासाची अनेक स्वप्नं दाखवली. त्या स्वप्नांपैकीच एक म्हणजे देशातील अत्यंत वेगाने धावणारी बुलेट ट्रेन. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. प्राप्त माहिती अशी की, ही ट्रेन बीकेसी ते अहमदाबाद असा प्रवास करेन. दरम्यान, बुलेट ट्रेनच्या कामाची सुरूवातही करण्यात आली आहे. बीकेसी हे बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन असेन. पुढील मार्गासाठी जमीनीचा स्तर आणि गुण शोधाण्यासाठी जैवीक काम सुरू आहे.
मॅग्नेटीक महाराष्ट्र २०१८ ही परिषद नुकतीच पार पडली. यात मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांनीही भाग घेतला. या परिषदेत बुलेट ट्रेनचा मोठ्या उत्साहाने उल्लेख करण्यात आला. पण, या बुलेट ट्रेनमधून तुम्हाला जर प्रवास करायचा असेल तर, हा प्रावास सर्वसामान्यांना परवडणारा नाही. 'नवभारत टाईम्स'ने वृत्तात दिलेल्या आकडेवारीनुसार, ठाणे ते बीकेसी असा एकतर्फी प्रवास करण्यासाठी तुम्हाला २५० तर बीकेसी ते विरार प्रवासासाठी तुम्हाला ५०० रूपये मोजावे लागू शकतात. जे लोक बीकेसी ते भोईसर प्रवास करू इच्छितात त्यांना एकवळ एकेरी प्रवासासाठी ७५० रूपयांपर्यंत पैसे मोजावे लागू शकतात.
नेहमीच्या प्रवासी साधनांचा विचार करता बुलेट ट्रेन ही भलतीच महाग ठरणारी दिसते. बुलेट ट्रेनच्या मासिक पास सवलतीचा विचार करता ही रक्कम रेल्वेच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या तुलनेत बुलेटचा प्रवास हा सध्या तरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचेच दिसते.