लाखो मुंबईकरांचे हाल, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनाला

एकीकडे लाखो मुंबईकर त्रस्त असताना रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 

Updated: Sep 4, 2019, 09:30 PM IST
लाखो मुंबईकरांचे हाल, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनाला title=

मुंबई : एकीकडे लाखो मुंबईकर त्रस्त असताना रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. साधी कोणतीच प्रतिक्रिया ही त्यांनी मुंबईच्या या लोकल समस्येवर दिली नाही. लाखो प्रवाशी एकीकडे घराबाहेर आहेत. 9 तासांपासून मध्ये रेल्वेची सेवा ठप्प आहे. पण रेल्वे मंत्री पियुष गोयल मात्र बेजबाबदारपणेच वागत असल्याची प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया आहे. रेल्वे उपाययोजनेवर रेल्वेमंत्र्यांचं एकही ट्विट आलेलं नाही. प्रसार माध्यमांना देखील त्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. आज पियुष गोयल यांनी सकाळपासून काही ट्विट केले पण त्यांनी मुंबईकरांबद्दल कोणतंच ट्विट केलं नाही. मुंबईचे असून ही पियुष गोयल यांनी मुंबईकरांची आज जराही दखल घेतली नाही.

सर्वाधिक दयनीय अवस्था होती रेल्वे प्रवाशांची. हवामान खात्याने गणपती उत्सवात रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचा इशारा ५ दिवसांपूर्वीच दिला होता. मात्र मनपा प्रशासन, रेल्वे प्रशासन, राज्य सरकार कोणत्याही स्वरूपात तयार असल्याचं दिसलं नाही. ट्रॅकवर पाणी भरायला लागल्यावर मध्य रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी, पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते चर्चगेट आणि वसई ते विरार दरम्यान वाहतूक बंद होती. तर हार्बर मार्गावर वाशी ते सीएसएमटी वाहतूक पूर्ण ठप्प होती.

१०० मिमी पाऊस झाला आणि मुंबई पुन्हा विस्कळीत झाली. १०० मिमी पावसाने मुंबईची अव्यवस्था पुन्हा जगासमोर आली. गेल्या २४ तासांत मुंबईत १०० मिमी पाऊस झाला आणि मुंबापुरीची तुंबापुरी झाली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला आणि जनजीवन विस्कळीत झालं. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागाला पावसाने झोडपून काढलं. 

राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

>