मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आठवडाभरात रुग्णसंख्या 26 टक्क्यांनी घटली

राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक

Updated: Jul 27, 2021, 08:04 AM IST
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! आठवडाभरात रुग्णसंख्या 26 टक्क्यांनी घटली title=

मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात सोमवारी रुग्णसंख्या 5 हजाराच्या आत आली आहे. तर मुंबईतही दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईतली रुग्णसंख्या 26 टक्क्यांनी घटली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.43टक्के झाला आहे तर मुंबईचा 97 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 88 हजार 729 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधीही 1हजार 324 वर गेला आहे. 

राज्यात आज रोजी एकूण ८८,७२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी मात्र ही संख्या ५ हजारांच्या खाली आली असून राज्यात मागील २४ तासांत ४,८७७ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात सोमवारी ११,०७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५३ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मत्यूदूर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६९,९५,१२२ प्रयोगशाळा नमुण्यांपैकी ६२,६९,७९९ (१३.३४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये करोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ठाणे, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर मुंबई, सांगली आणि साताऱ्यात ७ हजाराहून अधिक करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास जूनपासून सुरुवात झाली तरी जून महिन्यात प्रतिदिन रुग्णसंख्या ६०० ते ८००च्या दरम्यानच राहिली. या महिन्यात रुग्णसंख्येचा आलेख स्थिरच राहिला. जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून यात थोडी घट व्हायला सुरुवात झाली. मात्र १५ जुलैपर्यंत प्रतिदिन रुग्णसंख्या ही ५०० च्यावरच राहिली. परंतु आता गेल्या आठवडय़ाभरापासून प्रतिदिन रुग्णसंख्येचा आलेख ५०० च्याखाली आला आहे.

मुंबईत प्रतिदिन केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या संख्येतही आठवडाभरात १६ टक्क्यांनी घट झाली आहे. ११ ते १७ जुलै दरम्यान शहरात सरासरी ३२ हजार ६०० चाचण्या केल्या गेल्या. परंतु १८ ते २४ जुलै या काळात यात घट होऊन सरासरी चाचण्यांची संख्या २८ हजार ४३९ झाली आहे.

मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १३२४ दिवसांवर पोहोचला असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले आहे. सोमवारी आणखी २९९ जण बाधित झाले असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ५०१ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले. तर ५३९७ उपचाराधीन रुग्ण आहेत. रविवारी २४ हजार ९८९ चाचण्या करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्य़ात ३०५ नवे रुग्ण आढळून आले. तर ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील ३०५ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली १०२, नवी मुंबई ५८, ठाणे ५३, मीरा-भाईंदर ३७, ठाणे ग्रामीण २१, अंबरनाथ १६, बदलापूर ९, उल्हासनगर ७ व भिवंडीत दोन रुग्ण आढळून आले.

बाधितांचे प्रमाण कमी झाले असले तरी मृतांच्या संख्येत मात्र फारशी घट झालेली नाही. ११ ते १७ जुलै या आठवड्यात एकूण ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १८ ते २४ जुलै या आठवडय़ात ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून बाधितांचे प्रमाणही कमी झाले आहे. मृतांची संख्या पुढील आठवडय़ात कमी होण्याची शक्यता आहे. दुसरी लाट ओसरायला बराच कालावधी लागला असला तरी आता रुग्णसंख्या कमी होत आहे, हे आशादायक चित्र आहे.