मुंबई: देशभरात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून (NRC) गदारोळ सुरु असताना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या एका वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. NRC आणि CAA विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संजय बर्वे यांनी बुधवारी मुंबईतील मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय बर्वे यांनी म्हटले की, माझ्याकडेही जन्माचा दाखला नाही. मात्र, नागरिकत्व सिद्ध करण्याची वेळ आल्यावर मी ते करेन. माझ्याकडे जन्माचा दाखला नसला तरी मी देशात राहतो. त्यामुळे जर मलाच धोका नसेल तर मुस्लिमांचे नागरिकत्व संकटात असण्याचा प्रश्न येतोच कुठून, असा सवाल संजय बर्वे यांनी उपस्थित केला.
NRCबाबत अजून काही ठरलंच नाही; अमित शहांचा यू-टर्न
तसेच आम्ही सध्या मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी मागणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून पाहत आहोत. मुस्लिमधर्मीयांना कोणाच्याही भूलथापांना बळी पडून परवानगी नसलेल्या आंदोलनात सहभागी होऊ नये. केवळ जे लोक घुसखोर असतील त्यांनाच त्रास होईल. त्यामुळे तुम्ही गैरप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन संजय बर्वे यांनी मुस्लिम धर्मगुरूंना केले.
तसेच आता आंदोलनाच्या परवानगीसाठी चकरा मारणारे लोक डाव्या विचारसरणीचे आहेत. मी त्यांना चांगलेच ओळखून आहे, असेही संजय बर्वे यांनी म्हटले. याशिवाय, डिटेशन्स सेंटर्स ही घुसखोरांसाठी आहेत. ते भारतात आल्यानंतर आपला पासपोर्ट फाडून फेकून देतात. यानंतर भारतात ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय करतात. पासपोर्ट फाडून फेकल्यामुळे त्यांना इतर कोणत्या देशात पाठवता येत नाही. त्यामुळे अशा लोकांसाठी ही डिटेन्शन सेंटर तयार करण्यात आल्याचा खुलास संजय बर्वे यांनी केला.