मनसे नेते संदीप देशपांडे अद्यापही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक

Loudspeaker Controversy: मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे  (Sandeep Deshpande ) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दोघांवरही अटकेची टांगती तलवार आहे.  

Updated: May 6, 2022, 01:48 PM IST
मनसे नेते संदीप देशपांडे अद्यापही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक title=

मुंबई : Loudspeaker Controversy: मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दोघांवरही अटकेची टांगती तलवार आहे. 4 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थवरुन आंदोलनादरम्यान पोलिसांना चकवा देऊन दोघे कारमधून पळाले होते. ही कार ज्या ड्रायव्हरनं चालवली होती, त्याला आणि दादर शाखाप्रमुख संतोष साळी यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

संदीप देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले होते. त्यावेळी एक महिला पोलीस देखील जखमी झाली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज संदीप देशपांडे यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. पण, संदीप देशपांडेंसह संतोष धुरी दोघेही अद्याप फरार आहेत. मुंबई पोलीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांचा शोध घेत आहेत. दोघांनीही आपले मोबाईल बंद करुन ठेवले आहेत. त्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबाद सभेच्या वेळी 3 मेपर्यंत मशिदीवरुन भोंगे उतरले नाही तर मशिदीपुढे भोंग्यांवरुन हनुमान चालिसा वाजवा, असे म्हटले होते.  त्यानुसार कार्यकर्त्यांनी 4 मे रोजी पहाटेपासून मशिदीसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. इमारतींवर चढून भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजविण्यात आली. यावेळी मुंबई पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली.

मुंबई पोलीस संदीप देशपांडे यांच्या मागावर होते. देशपांडे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यानंतर ते पोलिसांना चकवा देत पळून गेले. यावेळी देशपांडे यांची पोलिसांसोबत झटापट झाली. यामध्ये एक महिला पोलिस जखमी झाली. त्यानंतर देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.