महिलांशी फोनवर अश्लील संवाद साधणाऱ्या विकृतास बेड्या

 वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी एका विकृताला अटक केली आहे.

Updated: Sep 23, 2019, 08:43 PM IST
महिलांशी फोनवर अश्लील संवाद साधणाऱ्या विकृतास बेड्या  title=

मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी एका विकृताला अटक केली आहे. याने आतापर्यंत अनेक महिलांना फोन करून अश्लील भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. महिला-मुलींना फोन करताना आरोपी विविध फोन नंबरचा वापर करीत त्यांना जीवे मारण्याची धमकीही द्यायचा. त्यामुळे नेमका हा आरोपी कोण आहे ? याचा तपास लागत नव्हता. एका मुलीला जीवे मारण्याची धमकी ह्या आरोपीने दिल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत वडाळा ट्रक टर्मिनस येथे तक्रार देत गुन्हा नोंदवला. त्यानंतर हा विकृत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

आरोपी हा परराज्यात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्याचा  नेमका शोध घेणे कठीण होते. पोलिसांनी अधिक तपास करीत विजयकुमार उमाशंकर गुप्ता या 35 वर्षीय आरोपीस हरियाणा येथून अटक केली. आरोपी हा सुरक्षा रक्षकांचे काम करायचा आणि इमारतीत भेट देणाऱ्या नागरिकांची नाव, मोबाइल नंबर जमा करायचा. त्यानंतर विविध मोबाईल नंबरहुन मुली आणि महिलांशी अश्लील भाषेत संभाषण करायचा. 

अखेर या विकृताला पोलिसांनी अटक केली असून त्याने आतापर्यंत अनेक महिलांना असेच फोन केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडून दोन मोबाइल फोन विविध कंपन्यांचे 6 सिमकार्ड, अनेक महिलांचे मोबाईल क्रमांक इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.