Mumbai Local Train Update: लोकल ट्रेनचा विस्तार अधिक वेगाने करण्यात येत आहे. मुंबई उपनगरातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP)3 अंतर्गंत पनवेल ते कर्जत दरम्यान 29.6 किमीची नवी मार्गिका तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे 56 टक्के काम सुरू झाले आहे. कर्जत-पनवेल या नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यांमध्ये खडीरहित रूळ टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
कर्जत-पनवेलदरम्यान हा नवीन मार्ग उभारण्यात येत आहे. या रेल्वे मार्गावर तीन बोगदे असून बोगद्यांच्या भुयारीकरणासाठी न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. सध्या या प्रकल्पातील बोगद्यांमध्ये बॅलेस्ट लेस ट्रॅक टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, आश्रय क्षेत्र, एक बोगदा नियंत्रण प्रणाली, प्रकाशव्यवस्था, अग्निशामक यंत्रणा यावर काम सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत.
पनवेल-कर्जतदरम्यान 29.6 किमीपर्यंतच्या कॉरिडोरची उभारणी केली जाणार आहे. याच मार्गावर 2 किमी लांबीच्या वावर्ली बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हा बोगदा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे-कल्याण स्थानकातील गर्दी मोठ्या संख्येने कमी होणार आहे. या मार्गावरुन मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर मुंबई ते कर्जतदरम्यान पनवेलमार्गे लोकलदेखील सोडण्यात येणार आहेत.
मुंबई ते कर्जतदरम्यान सुरू असलेल्या मार्गिकेवर 5 स्थानके असणार आहेत. नवी मुंबईतील रायगड जिल्हा कर्जतला जोडणे व एमएमआरएचा विस्तार करणे हा आहे. यामुळं मुंबई लोकलला एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. पनवेल आणि कर्जत दरम्यानच्या मार्गिकेवर पनवेल, चिकले, महापे, चौक आणि कर्जत हे पाच स्थानके असणार आहे. रेल्वे मार्गाची एकूण लांबी 30 किमी असून उड्डाणपूल २ उभारण्यात येणार आहे. तर, 44 पूल त्यात ८ मोठे पूल आणि 36 लहान पूल बांधण्यात येणार आहे.एमयूटीपी-३ अंतर्गंत एकूण 10,947 कोटींचा खर्च येणार आहे. या प्रकल्पाला 2016मध्ये मंजुरी मिळाली होती. तर, याची डेडलाइन 2025 असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण आणि ठाणे स्थानकातील गर्दी विभागणार आहे.