मुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रक

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरणार आहे. रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 29, 2024, 07:38 AM IST
मुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रक  title=
Mumbai local train update central railway announce mega block on sunday

Mumbai Local Train Update: रेल्वेकडून रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ठाणे ते कल्याणदरम्यान तर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान त्याचबरोबर, बोरीवली ते राममंदिर स्थानकादरम्यान रेल्वेने ब्लॉक जाहीर केला आहे. अलीकडेच मुंबईत पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. अशातच रेल्वेने तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आयोजित केल्याने लोकलचे वेळापत्रक बिघडणार आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

रेल्वे रूळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती या ब्लॉक काळात करण्यात येणार आहे. तसंच, या दरम्यान लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून एक्स्प्रेसही 10 ते  15 मिनिटांच्या विलंबाने धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यादरम्यान लोकलचे वेळापत्रक कसे असेल याची माहिती रेल्वेने सविस्तर दिली आहे. 

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक 

ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळं अप मेल-एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर, डाउन मेल गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. अप आणि डाउन जलद मार्गावरील गाड्या 10 ते 15 मिनिटे उशीराने धावतील. 

पश्चिम रेल्वेवरील वेळापत्रक 

मेमू क्रमांक 01339 वसई रोड-दिवा गाडी सकाळी 9.50 वाजता सुटेल. ही गाडी वसई रोडवरुन कोपरपर्यंत धावेल. तर कोपर आणि दिवा स्थानकादरम्यांन ही सेवा रद्द राहिल. बोरीवली ते राममंदिर स्थानकादरम्यामही मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

पनवेल-वाशी मार्ग बंद

हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 यावेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात छत्रपची शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल-बेलापूर आणि ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप-डाउन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी, ठाणे ते वाशी/ नेरूळ, बेलापूर-नेरूळ आणि उरणदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत. 

- पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द असेल. 

- पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20पर्यंत पनवेल येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहणार आहेत.