Lalbaugcha Raja : मुंबईसह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राज्याच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. राजकीय आणि बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी या दहा दिवसात लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. पण राजाच्या मंडपात भाविकांना अनेकवेळा कार्यकर्त्यांकडून किंवा सुरक्षेसाठी असलेल्या बाऊन्सरकडून धक्काबुक्की होत असल्याचे प्रकार पाहायला मिळतात. नुकतचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात लालबागच्या राजाच्या एका पायाजवळ सामान्यांना मानेला धरून धक्का मारून बाजूला केलं जात असल्याचं दिसत आहे तर बाप्पाच्या दुसऱ्या पायाजवळ काहींना आरामात फोटो, सेल्फी क्लि करायला वेळ दिला जात असल्याचं दिसत आहे
अभिनेत्रीबरोबर धक्काबुक्की
धक्काबुक्कीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका टीव्ही अभिनेत्रीलाही तिथल्या बाऊन्सरच्य मुजोरीपणाला सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली आहे. टीव्ही अभिनेत्री सिमरन बुधरुप (Simran Budharup) हिला लालबागच्या राजाच्या मंडपात महिला बाऊन्सरने धक्काबुक्की केली. एक बाऊन्सरने तर तिच्या आईलाही धक्का देत तिच्या हातातला फोन हिसकावून घेतला. सिमरनने याचा व्हिडिओ सोशल मीडियावरर शेअर केला आहे.
टीव्ही मालिका 'पंड्या स्टोर'ची ( Pandya Store) अभिनेत्री सिमरन बुधरुप गुरुवारी प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आली होती. सिमरनबरोबर तिची आईदेखील होती. यावेळी मंडपात असलेल्या महिला बाऊन्सरने सिमरनबरोबर शाब्दिक वाद घालत तिला धक्काबुक्की केली. सिमरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सिमरन आणि तिची आली दर्शनासाठी रांगेत उभे होते. यावेळी तिची आई आपल्या मोबाईलने राजाचं व्हिडिओ शुटिंग करत होती, पण त्यावेळी एका महिला बाऊन्सरने तिच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल परत मागितला असता सिमरन आणि तिच्या आईला धक्के मारून मंडपाच्या बाहेर काढण्यात आलं.
सिमरनने काय म्हटलं आहे पोस्टमध्ये
सिमरनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'आज मी आईसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गेली होती. पण तिथल्या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तणूकीमुळे आम्हाला खूपच खराब अनुभवाला सामोरं जावं लागलं. समितीतल्या एका कर्मचाऱ्याने माझ्या आईच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल फोन परत मागितला असता त्यांनी आपल्या आईला धक्काबुक्की केली. आईला वाचवण्यासाटी मी गेले असता माझ्यासोबतही त्यांनी गैरवर्तणूक केली. त्यांच्या व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेव्हा त्यांना कळलं की मी अभिनेत्री आहे, तेव्हा ते मागे झाले'
सिमरनने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय 'लोकं बाप्पाच्या आशिर्वादासाठी येतात, पण त्यांच्याबरोबर गैरवर्तन केलं जात आहे. इथे खूप गर्दी असते आणि इतक्या लोकांना सांभाळणं हे एक आव्हान आहे. पण भाविकांना कोणतंही नुकसान न पोहोचवता व्यवस्था राखणं ही इथल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.'
सिमरन बुधरूपने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.