मुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती; जाणून घ्या काय आहे रेल्वे सेवांची परिस्थिती

तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना चांगलंच झोडपून काढलं

Updated: Sep 5, 2019, 07:08 AM IST
मुंबईसह उपनगरात पावसाची विश्रांती; जाणून घ्या काय आहे रेल्वे सेवांची परिस्थिती  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : तीन दिवसांपासून सलग कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना चांगलंच झोडपून काढलं. ऐन गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये वरुणराजा बरसण्यास सुरुवात झाली आणि अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. बुधवारी पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. परिणामी रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. आठ तासांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मध्य रेल्वेची सेवा अखेर पूर्वपदावर येताना दिसत आहे. 

सखल भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली ज्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची रुळावरुन घसरलेली गाडी रुळावर येत आहे. गुरुवारी पहाटेपासून पावसाने काशीही उसंत घेतल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. पहाटे ३ वाजून १७ मिनिटांनी पहिली लोकल अंबरनाथच्या दिशेने रवाना करण्यात आली. सध्याच्या घडीला सीएसएमटी येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या वेळेत आहेत. पण, कल्याणकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे मात्र काहीशा उशिराने येत आहेत. हळुहळू ही परिस्थितीही पूर्वपदावर येण्याची चिन्हं आहे.  

मध्य रेल्वेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली. सोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडलं होतं. लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर, काही रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.