गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात (Mumbai Police) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांचा समावेश असल्याचे समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.
धमकी आणि कट रचल्याचा आरोपाखाली करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा या डिझायनरविरोधात मलबार हिल पोलिसात प्रथम माहिती अहवाल दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एका फौजदारी खटल्यात हस्तक्षेप करण्यासाठी त्यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. अमृता फडणवीस यांना यासाठी सातत्याने फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारीला तक्रारीनुसार अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने त्यांच्या घरीदेखील भेट दिली होती. अनिक्षाकाने कथितपणे अमृता फडणवीस यांना पैसे कमावाण्यासाठी काही बुकींची माहिती दिली होता. त्यानंतर अनिक्षाने थेट त्यांना तिच्या वडिलांना एका पोलीस प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असे एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अनिक्षाकाने त्यांना 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अज्ञात फोन नंबरवरून अनेक मेसेज पाठवले होती. अनिक्षा आणि तिचे वडील आपल्याविरोधात अप्रत्यक्षपणे कट रचत होते आणि आपल्याला धमकी देत असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.