Video: समुद्री तटाचा आणि भुयारी मार्गाचा अनुभव घेता येणार; कोस्टल रोडची पहिली झलक

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पाचे लोकार्पण सोमवारी होणार आहे. यापूर्वी महापालिकेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 10, 2024, 03:37 PM IST
Video: समुद्री तटाचा आणि भुयारी मार्गाचा अनुभव घेता येणार; कोस्टल रोडची पहिली झलक title=
Mumbai coastal road to be operational on 11 march monday

Coastal Road Project: मुंबईतील बहुप्रतीक्षेत व महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड. कोस्टल रोड अखेर सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. सोमवारी 11 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. (Coastal Road Opening Date)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन होण्याची शक्यता होती. पण वेळेच नियोजन होत नसल्याने आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सोमवारी होणार आहे. 

19 फेब्रुवारीलाच कोस्टल  रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले जाणार होतं. मात्र पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने हे उद्घाटन रखडले आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे 85% पेक्षा अधिक काम पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह पर्यंत 4 लेन सुरू करण्यात येणार आहेत. तर, मे 2024 पर्यंत प्रकल्पाचे पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे. 

कोस्टल रोड कसा असेल?

कोस्टल रोड कसा असेल याची एक झलक मुंबई महानगरपालिकेने दाखवली आहे. BMC ने एक ट्विट केलं आहे. त्यात एक छोटा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, तयार व्हा. विलोभनीय समुद्री तटाचा आणि भुयारी मार्गाचा अनुभव घेत प्रवास करायला. मुंबई किनारी रस्ता लवकरच आपल्या सेवेत, असं महापालिकेने म्हटलं आहे. 

महापालिकेने शेअर केलेल्या व्हिडिओत, भुयारी मार्ग दिसत आहे. विशेष म्हणजे हा भुयारी मार्ग समुद्राच्या पोटातून जाणार आहे. तर समुद्राच्या एकदम जवळून जाण्याचा अनुभव घेता येणार आहे. वरळी ते मरीन लाइन्स या पहिल्या टप्प्यात दोन किमी लांबीचे संमातर बोगदे असणार आहे. यामुळं वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागणार आहे. 

प्रवाशांचा वेळ वाचणार 

सध्या कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. 10.58 किमीपर्यंतचा पहिला टप्पा असून वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या पहिल्या टप्प्यात 100 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. तसंच, आगीसारख्या दुर्घटना घडू नये यासाठी शकार्डो सिस्टमदेखील लावण्यात येणार आहे.