Coastal Road Project: महापालिकेचा महत्त्वकांक्षी आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड (Coastal Road). 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार होते. मात्र, पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्याने हे लोकार्पण लांबणीवर पडले होते. मात्र, आता कोस्टल रोडच्या उद्घाटनाची नवीन तारीख समोर येत आहे. मुंबईच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचे उद्घाटन होणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 27 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी किंवा 3 मार्च यापैकी एका तारखेला होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार पुलाचे लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती समोर येतेय.
19 फेब्रुवारीलाच कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले जाणार होतं. मात्र पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने हे उद्घाटन रखडले आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे 85% पेक्षा अधिक काम पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. वरळी ते मरीन ड्राइव्ह पर्यंत 4 लेन सुरू करण्यात येणार आहेत. तर, मे 2024 पर्यंत प्रकल्पाचे पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे.
मरीन ड्राइव्ह ते वरळीपर्यंतचा एक 10.58 किमीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. एकदा का हा पुल सुरू झाला की नागरिकांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. कोस्टल रोडच्या माध्यमातून 10 किमीपर्यंतचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसंच, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत 100 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. आगीच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी शकार्डो सिस्टमदेखील लावण्यात येणार आहे.
वरळी ते मरीन लाइन्स या पहिल्या टप्प्यात दोन किमी लांबीचे संमातर बोगदे असणार आहेत. या बोगद्यांचे काम पूर्ण झाले असून वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या 30 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, कोस्टल रोडवरुन प्रवास केल्यास 10 ते 10 मिनिटांचा वेळ लागणार आहे.
कोस्टल रोड खुला झाल्यानंतर त्यावर 24 तास वाहने चालवता येणार नाहीयेत. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत वरळी ते मरीन ड्राइव्ह प्रवास करु शकता. म्हणजेच 12 तास या पुलाचा वापर करु शकता. या पुलावर प्रवास करताना वेगमर्यादा 80 किमी प्रति तास इतकी असेल.