कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : एसआरएमधल्या अधिकाऱ्यांच्या कृपेने कुर्ल्यामध्ये विकासकानं चक्क रस्त्यावरच इमारत बांधलीय. कहर म्हणजे एसआरएनं या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रही देवून टाकलंय. मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागानं याप्रकरणी नोटीस पाठवून कारवाई करायला सांगूनही संबंधित विकासकाला पाठिशी घालण्याचे काम एसआरए करतंय. मुंबईतल्या कुर्ला पूर्वेचा हा परिसर... कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ अंगोलीमाला बाबा होम्स डेव्हलपर्सनं झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विकसित करायला घेतलाय. पण या इमारतीचा निम्मा भाग रस्त्यावर बांधल्याचं समोर आलंय.
मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागानं एसआरएला याप्रकरणी नोटीस पाठवून संबंधितांवर कारवाई करायला सांगितलंय. महापालिकेच्या म्हणण्यानुसार डेअरी रोडवर सुमारे १५ फूट रस्त्यात ही इमारत आलीय... तर दुसऱ्या बाजूच्या एसजी बर्वे रोडवरही ३-४ फूट इमारत रस्त्यात आलीय. महापालिकेच्या सर्व्हे विभागानं जानेवारी आणि मार्चमध्ये दोनदा पत्र लिहून म्हाडा, एसआरए आणि विकासकाला एकत्रित सीमांकन करण्यास सांगितले होते. पण त्याकडं दुर्लक्ष करत एसआरएनं चक्क या इमारतीला सप्टेंबरमध्ये अंशत: भोगवटा प्रमाणपत्रही दिलंय.
आता या रस्त्यावर बांधलेल्या इमारतीमधले दुकानगाळे विकासक जबरदस्तीनं १७ गाळेधारकांना ताब्यात घेण्यास भाग पाडतोय. भविष्यात या इमारतीवर पालिकेकडून हातोडा पडण्याची शक्यता असल्यानं गाळेधारकांनी याला विरोध केलाय.
हा प्रकल्प विकसित करणाऱ्या 'बाबा होम्स' बिल्डर्सशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतीत काहीच उत्तर दिलं नाही. विकासक आणि एसआरए अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीतून रस्ताच गायब होत असतानाही कारवाई मात्र काहीच होत नाही, हे दुर्देव...