मुंबई : मुंबईतल्या नायर रुग्णालयात बाळंतपणासाठी आठवड्याभरापूर्वी दाखल झालेल्या शीतल साळवी या महिलेचे पाच दिवसांचं चोरी गेलेलं बाळ अखेर पुन्हा मातेकडे सुखरुप सोपवण्यात पोलिसांना यश आलंय. गुरुवारी सायंकाळी रुग्णालयातून या अवघ्या पाच दिवसांच्या लहानग्याला एका महिलेनं चोरी केलं होतं. त्यानंतर ही महिला फरार झाली होती. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तापासाची सूत्रे फिरवत अवघ्या काही तासांत आरोपी महिला आणि बाळाचा शोध लावलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, नायर रुग्णालयात दहिसरमध्ये राहणाऱ्या शीतल साळवी नावाच्या महिलेनं या चिमुकल्याला जन्म दिला होता. गुरुवारी शीतल आपल्या चिमुकल्याशेजारी झोपली असताना एका अज्ञात महिला बाळ चोरी करून तिथून फरार झाली. जाग आल्यानंतर बाळ जागेवर नाही हे पाहून त्याच्या आईला रडू अनावर झालं.
रुग्णालयातील अधिकाऱ्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यावेळी त्यांना एक महिला चिमुकल्याला बॅगमध्ये भरून रुग्णालयातून बाहेर पडताना दिसली. या महिलेचं वय अंदाजे ४० च्या आसपास असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
हेजल कोरिया असं या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. हेजल नालासोपारातील रहिवासी आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर प्रसुती झाली आणि हे आपलं बाळ आहे असं म्हणून हेजल वाकोल्यातील एका रुग्णालायत दाखल झाली होती. मात्र, तिचं हे नाटक फारकाळ टिकू शकलं नाही.
गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हेजल कोरियानं बाळ चोरी करून पळ काढला होता. मात्र, हा संपूर्ण प्रकार नायर रुग्णालायतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी हेजल कोरियाला अटक करून बाळाला सुरक्षित त्याच्या माता पित्याकडे सोपवलं.
बाळ सुखरुप आपल्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं असलं तरी नायर रुग्णालयातील सुरक्षा हा चर्चेचा विषय ठरलाय. उल्लेखनीय म्हणजे गेल्या महिन्यात याच रुग्णालयात डॉक्टर पायल तडवी हिनं रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती.