रेल्वेच्या गोंधळामुळे सीएसएमटी स्थानकावर १० हजार तर टिळक टर्मिनसला १५ हजार प्रवासी

 इंजिन नाही म्हणून प्रवासी भरलेल्या काही गाड्या ३-३ तासापासून स्टेशनवर उभ्या

Updated: May 26, 2020, 11:29 PM IST

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : रेल्वेने घातलेल्या गोंधळामुऴे सीएसएमटी स्टेशनवर १० हजार तर लोकमान्य टिळक टर्मिनसला १५ हजार प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. सीएसएमटी स्टेशनची क्षमता २३ रेल्वे गाड्यांची असताना रेल्वेने ४६ गाड्यांचं वेळापत्रक एका दिवशी लावलं आहे. इंजिन नाही म्हणून प्रवासी भरलेल्या काही गाड्या ३-३ तासापासून स्टेशनवर उभ्या आहेत.

रेल्वेने दिलेल्या शेड्युलप्रमाणे पोलीस प्रवाशांना घेऊन स्टेशनवर आले मात्र रेल्वेकडून रॅक उपलब्ध नसल्याचं कारण सांगितलं जातयं. राज्य सरकार तिकीटाचे पैसे देत असल्याने एका गाडीचं एकच तिकीट द्यावं अशी राज्य सरकारची मागणी आहे. मात्र रेल्वेनं प्रत्येक प्रवाशांला वेगळं तिकीट घ्यावं लागेल सांगून रांगेत उभ केलं. 

धारावीतील झोनसाठी आजच्या एका दिवशी ३६ रेल्वेगाड्या दिल्या गेल्या. एवढ्या प्रवाशांना स्टेशनवर नेण्याची जबाबदारी संबंधित झोनवर असल्याने पोलीसांची प्रचंड दमछाक झाली आहे. सकाळी १० वाजता सुटणाऱ्या गाडीची वेळ पहाटे ३ वाजता कळवण्यात आली. एवढ्या कमी कालावधीत आणि पहाटे कसं एकत्र करणार ? हा प्रश्न पोलीस प्रवाशांसमोर उभा राहीला. 

२४ तास आधी रेल्वेचं वेळापत्रक पोलीसांना द्यायचं ठरलेलं असताना रेल्वेनं  रेल्वेच्या वेळपत्रकासह यादी पहाटे दिली. हजारो प्रवासी उपाशी-तापाशी गावी जाण्याच्या ओढीने स्टेशनवर ताटकळत बसले आहेत.