#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एका आईचा आकांत

कानठळ्या बसवणारा आवाज आणि किंकाळ्या....

Updated: Jul 16, 2019, 05:26 PM IST
#Dongri : 'ढिगाऱ्याखाली माझी मुलगी अडकली आहे'; एका आईचा आकांत   title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या डोंगरी परिसरात असणारी १०० वर्षे जुनी इमारत कोसळली. प्राथमित स्तरावर हाती आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जाणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४० हून अधिक रहिवासी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय सर्वसामान्य अशाच दिवशी कोणतीही कल्पना नसताना काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं, असंच एकंदर चित्र सध्या या दुर्घनाग्रस्त परिसरात पाहायला मिळत आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना झाली त्यावेळी मोठा आवाज झाला होता. 'जणू काही भुकंपच होत आहे असं वाटलं, सोसाट्याचा वारा सुटला होता, मोठा आवाज झाला आणि पाहतो तर काय, ती इमारत कोसळली होती', अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. 

डोंगरीमध्ये घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मिळतात तातडीने अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, एका बाळाला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं. पण, या साऱ्याच एका आईची आर्त हाक अनेकांच्याच काळजात चर्रssss करुन गेली. 

दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये आपली मुलगी राहायला होती असं सांगत एका रहिवासी महिलेच्या आईने घटनास्थळी टाहो फोडल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं. 'चार- पाच महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. ती ढिगाऱ्याखाली आहे.... अडकली आहे.....ती घरी एकटीच होती. तिचे पती कामावर होते. ते आता आले आहेत. पण, कोणीतरी तिला बाहेर काढा', असं म्हणत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेच्या आईने घटनास्थळी आकांत केला.