सांताक्रूझमध्ये विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू

 सांताक्रूझमध्ये विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना 

Updated: Aug 4, 2019, 07:05 PM IST
सांताक्रूझमध्ये विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू  title=

मुंबई : राज्यासह मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे वाहतुकीवरही याचा परिणाम झालेला दिसतोय. रविवारचा दिवस आणि सकाळ पासूनच पावसाचे वातावरण असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. पण अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे. सांताक्रूझमध्ये विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. सांताक्रूझच्या पटेलनगर भागातील घटना घडली आहे. आई माला, मुलगा संकेत नगम असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

मध्य रेल्वे कोलमडली 

नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे पावसामुळे कोलमडलीय. ठाणे ते कल्याण एवढीच रेल्वे वाहतूक सुरू आहे. ठाणे ते सीएसएमटी आणि कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा अशी वाहतूक बंद आहे. हार्बर मार्गावरची वाहतूक बंद आहे. नाशिकच्या दिशेनंही इगतपुरीजवळ प्रचंड पाणी साठल्यानं रेल्वे ट्रेन रद्द झाल्या आहेत.

कोकण रेल्वे ठप्प 

मुंबई,नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, नाशिक रत्नागिरी, पालघर,आदी भागात धो धो पाऊस सुरू असल्याने सेंट्रल रेल्वेने पुढील 24 तास सर्व गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोकण रेल्वेही बंद असणार आहे. या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर विविध स्थानकात थांबवून ठेवण्यात आलेल्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो प्रवासी विविध स्थानकात अडकून पडले आहेत.