बोलो जुबाँ केसरी! पुढे देसाई बोलत होते, मागे अब्दुल सत्तारांनी पुडीच काढली... काँग्रेसने व्हिडिओ केला व्हायरल

राज्य विधीमंडळाचं पावसाळा अधिवेशन सुरु असून विविध मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच विधानपरिषदेतला मंत्री अब्दुल सत्तार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने हा व्हिडिओ व्हायरल केला असून सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 26, 2023, 03:12 PM IST
बोलो जुबाँ केसरी! पुढे देसाई बोलत होते, मागे अब्दुल सत्तारांनी पुडीच काढली... काँग्रेसने व्हिडिओ केला व्हायरल title=

Abdul Sattar : राज्य विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) सुरु आहे. अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा आहे. अतिवृष्टी, शेतकरी, वारकरी, निधी वाटप अशा विविध मुद्दयांवर विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चक्क एक पुडी तोंडात टाकताना दिसत आहेत. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण होत असतं, त्यामुळे सभागृहातील प्रत्येक अपडेट थेट लाईव्ह कॅमेरात पाहता येते. अब्दुल सत्तारांची हिच हालचाल सभागृहाच्या कॅमेरात कैद झाली आहे आणि तो व्हिडिओ काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. 

काय आहे त्या व्हिडिओत
महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केलेला हा व्हिडिओ विधानपरिषदेतला असून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई निवेदन करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नमेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. त्यानंतर पीएम मोदींनी शिंदेंचं कौतुक करणारं एक ट्विट केलं होतं. याबाबतची माहिती मंत्री शंभूराज देसाई सभागहाला देत होते. देसाई यांच्या मागे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार बसलेले दिसत आहेत. देसाई निवेदन देत असताना सत्तार अचानक एक पुडी बाहेर काढणाता आणि तोंडात टाकताना या व्हिडिओ त दिसत आहे. 

काँग्रेसने केलं ट्विट
महाराष्ट्र काँग्रेसने हा व्हिडिओ ट्विट केला असून अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे.  'विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चघळतायत, उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?, असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

देसाईंचाही व्हिडिओ झाला होता व्हायरल
याआधी मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांचा विधानसभेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. गेल्या अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना भरत गोवागाले यांच्याकडे खुणेने काहीतरी मागितलं, त्यानंतर देसाईंनी एक पुडी भरत गोगावलेच्या हातावर टेकवली. त्यानंतर गोगावलेंनी तो पदार्थ हातावर मळून खाल्ला त्यानंतर ती पुडी पुन्हा देसाईंकडे दिली. याबाबत मीडियाने मंत्री देसाई यांना विचारलं असता मी किंवा गोगावले तंबाखू खात नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.