शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी....इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

कंगनाने मुख्यमंत्र्यांचा केला एकेरी उल्लेख 

Updated: Sep 10, 2020, 10:13 AM IST
शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी....इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असा एकेरी उल्लेख करणे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पटलेलं नाही. याप्रकरणावर ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. 

'शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. पण उद्धव ठाकरे हे माझे मुख्यमंत्री आहे. त्यांचा अनादर तेही अशा टॉम, डिक आणि हॅरी करून हे स्वीकारार्ह नाही. कंगनाने तिने केलेल्या वक्तव्याचा विचार करायला हवा,' असं इम्तियाज जलील यांनी ट्विट करून म्हटलं आहे. 

 उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल असं कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे. 

कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. येणाऱ्या काळात आता याला वेगळं वळण लागलं आहे. विरोधकांनी देखील शिवसेनेवर टीका केली आहे.

कंगना विरुद्ध शिवसेना शाब्दिक युद्ध सुरु असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते कंगनाच्या विरुद्ध आक्रमक होत असताना आता मात्र कंगनावर न बोलण्याचे आदेश मातोश्रीने नेत्यांना दिले आहेत.