Vidhan Parishad Election : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आमनेसामने आले आहेत. महायुतीकडून 9 तर मविआकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे घोडेबाजाराबरोबरच राजकीय शहकाटशहाचं राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत. महायुतीकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मविआ मात्र निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरली आहे.
मविआने दिले तीन उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीसाठी मविआने तीन उमेदवार दिलेत. काँग्रेसने प्रज्ञा राजीव सातव यांना पुन्हा संधी दिलीय. त्यांनी आज अर्ज दाखल केला. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित होते. तर शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे, सचिन अहिर उपस्थित होते. तर शेकापचे जयंत पाटलांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उद्धव ठाकरे, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुखांचीही यावेळीही उपस्थिती होती.
नार्वेकर-दरेकरांमध्ये गुफ्तगू
ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यात गुफ्तगू पाहायला मिळालं. नार्वेकरांनी विधान परिषदेसाठी आजच अर्ज भरलाय. त्यामुळे मते जुळविण्यासाठीची सुरूवात मिलिंद नार्वेकर यांनी केल्याची चर्चा सुरू झालीय. विधान परिषदेच्या बाहेरच्या लॉबीत दोन्ही नेते कोपऱ्यात जावून बोलत होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत असलेले काही आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असून याचा फायदा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आण्यासाठी होणार असल्याची सूत्रांकडून सांगण्यात येतंय.
विधानपरिषदेसाठी महायुती-महाविकास आघाडीचे उमेदवार
भाजपचे उमेदवार - पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस (AP) - शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर,
शिवसेना (Shinde Group) - कृपाल तुमाने, भावना गवळी
शिवसेना (UBT) - मिलिंद नार्वेकर
शरद पवार गट पुरस्कृत - जयंत पाटील (शेकाप)
काँग्रेस - प्रज्ञा राजीव सातव
कसं असेल गणित?
विधानपरिषदेत एकुण 274 सदस्य 11 आमदारांना निवडून देणार आहेत. त्यामुळे एका आमदाराच्या विजयासाठी 23 मतांचा कोटा असेल. महायुतीकडे सध्या 201 सदस्य आहेत. यात भाजपचे (103), शिंदे (37), राष्ट्रवादी (39), छोटे पक्ष (9), अपक्ष (13) अशी एकू 201 सदस्य संख्या आहे. पण महायुतीचं संख्याबळ पाहता त्यांना 9 वा उमेदवार निवडून आणताना त्यांची कसोटी लागेल.
दुसरीकडे महाविकास आघाडीलाही तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज आहे. संख्याबळानुसार काँग्रेसकडे (37), शिवसेना ठाकरे गट (15) राष्ट्रवादी शरद पवार गट (13), शेकाप (1), अपक्ष (1) अशी एकूण 67 सदस्य संख्या आहे. त्यामुळे दोन जागा सहज निवडून येऊ शकतात.पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार शरद पवारांच्या नेत्यांशी संपर्कात आहेत अशी चर्चा आहे. त्यांच्या मदतीनं तिसरा उमेदवार निवडून आणण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे..