MHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात

Mhada lottery 2024 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच Property मध्ये गुंतवणूक करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची.   

सायली पाटील | Updated: Jan 2, 2024, 08:56 AM IST
MHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात  title=
Mhada lottery 2024 online auction for shops latest updates

Mhada lottery 2024 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेकांनी अनेक प्रकारचे संकल्प केले. या संकल्पांमध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णयही अनेकांनीच घेतला. तुम्हीही त्यापैकीच आहात का? तर, म्हाडाच्या आगामी घोषणांकडे लक्ष असूद्या. कारण, नव्या वर्षात एक खास भेट देण्यासाठी म्हाडा सज्ज झालं आहे. 

म्हाडाच्या मुंबई महामंडळाकडे असणाऱ्या दुकानांचा ताटकळलेला लिलाव अखेर आता पूर्ण होणार असून, येत्या काळात ई ऑक्शन मार्गानं हा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत असणाऱ्या 170 दुकानांसाठी हा लिलाव होणार आहे. ज्यासाठीची जाहिरात जानेवारी महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध केली जाणार आहे. लिलावात समाविष्ट करण्याच आलेल्या दुकानांसाठी 25 ते 13 कोटी रुपये इतकी बोली रक्कम म्हाडाच्या वतीनं निर्धारित करण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : ऐन हिवाळ्यात राज्यावर पावसाचे ढग; पाहा कोणत्या भागात बरसणार सरी, कुठे वाढणार थंडीचा कडाका 

कोणत्या भागात किती दुकानं? 

कांदिवली- 12 
मागाठाणे- 12 
चारकोप- 34
मालवणी- 57
बिबिंसारनगर, गोरेगाव- 17
तुंगा, पवई- 3
गव्हाणपाडा, मुलुंड- 8
स्वदेशी मिल- 5
प्रतीक्षानगर, शीव- 15

म्हाडाच्या वतीनं सदर दुकानांच्या लिलावासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांना अनामत रक्कमेसह अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हाडाकडून त्यांची छाननी करण्यात येणार आहे. जिथं पात्र अर्ज वेगळे केले जातील आणि फेब्रुवारीमध्ये ई लिलाव पार पडेल. ई लिलावात अधिक बोली लावणारा अर्जदार दुकानाचा ताबा मिळवण्यास पात्र असेल, ज्यानंतर त्याला प्रक्रियेनुसार दुकान वितरित करण्यात येईल. म्हाडाकडून या ई लिलावात 9 ते 200 मीटरपर्यंतच्या दुकानांचा समावेश आहे.