Maharashtra Unseasonal Rain | राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यातील काही भागात अवकाळी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. 

Updated: Jan 30, 2022, 09:14 PM IST
Maharashtra Unseasonal Rain | राज्यातील 'या' भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता title=

मुंबई :  राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची लाट आहे. मुंबईतही या वेळेस चांगलीच थंडी जाणवतेय. सर्वांनाच हुडहुडी भरलीये. त्यात आता काही दिवसात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. (meteorological department has forecast unseasonal rains in north maharashtra marathwada and vidarbha)

राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 2 ते 4 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. 3 फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरण राहिल, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती पाहायला मिळतेय. 

शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. त्यात वेळी-अवेळी होणाऱ्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. त्यात आता या अवकाळीमुळे आपलं नुकसान तर होणार नाही ना, अशी भिती शेतकऱ्यांना वाटतेय. 

या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा अजूनही निच्चांकी पातळीवर आहे. धुळ्यात 4.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये पारा 10 अशांच्या खाली घसरला आहे. दोन्ही जिल्ह्यात आठवडाभरापासून शीतलहरीचा प्रकोप आहे. हुडहुडी भरवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे घरातून बाहेर पडणं ही अवघड झालंय. 

दरम्यान  2 फेब्रुवारी पर्यंत थंडी कायम असेल. तसेच पुढील काही दिवस थंडीपासून दिलासा मिळणार नसल्याचं हवामान खात्याचे सांगितलं आहे.