मुंबई : मध्य रेल्वेच्या ४५ लाख प्रवाशांचे भारतीय बनावटीच्या ‘मेधा’ लोकल सफारीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेवर मेधा लोकल चालवण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.
पश्चिम रेल्वेवर मेधा लोकल देऊन तेथील सिमेन्स लोकल मध्य रेल्वेवर आणण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र त्यास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हरकत घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आधुनिक बनावटीची मेधा मध्य मार्गावरच चालवण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल लवकरच धावणार आहे. त्यामुळे मध्य मार्गावरच मेधा लोकल चालवण्यात यावी अशी मागणी उच्चपदस्थ अधिकारी करत आहे. मध्य रेल्वेवर नवीन २४ लोकल दाखल होणार आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) लोकल बांधणीचे काम वेगाने सुरु आहे. उत्तम व्हेंटिलेशन मिळावे यासाठी मेधा लोकलच्या डब्यात विशेष संरचना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणारी यंत्रणाही बसवण्यात आली आहे.