मुंबई : वरळी येथील केशवआळीत राहणाऱ्या पुरी कुटुंबावर सोमवारी मोठं संकट ओढवलं. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने कुटुंबातील 4 जण भाजले. यातील महिला विद्या पुरी यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यातील चार महिन्यांच्या मुलाचा सोमवारीच मृत्यू झाला. 24 तासानंतर वडिलांचा मृत्यू झाला. आता या दुर्घटनेतील पाच वर्षाच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ५ वर्षाचे अनाथ बाळ वाचविण्यासाठी प्रयत्नशील. बाळ वाचल्यास आम्ही दत्तक घेणार. पालकत्व आम्हीच स्विकारणार. बाळाची प्रकृती ठिक आहे. किशोरी पेडणेकर यांनी पुढे विरोधकांना उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की,'संवेदना बोंब मारून येणार नाहीत, तर त्या ह्रद्यातून याव्या लागतात'.
तसेच दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर टीका होत आहे. याला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, 'ब्लास्ट झाल्यावर सेनेचे कार्यकर्ते पोहचले होते. उपचाराकरता त्यांना तात्काळ रूग्णालयातही नेण्यात आले. मात्र थोडा संभ्रम निर्माण झाल्यामुळे त्यांना नायर रूग्णालयात नेण्यात आले.'
पुढे महापौर म्हणाल्या की, तो व्हिडिओ कुणीही पाहिला तरी राग येण्यासारखाच होता. ज्या कंपनीची गॅस टाकी होती, त्या कंपनीसोबतही बोलत आहोत.
आशिष शेलार भ्रमिष्ट झालेत. पक्षात मानसन्मान मिळत नसल्याने ते भ्रमिष्ट झालेत. महिलेबद्दल निजल्या हा शब्द ते वापरतात आणि पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतात. आज साडेतीन वाजता महिला आघाडी पोलिसांना भेटणार. कोवीड काळात तम्ही कुठल्या निजलेल्यांना अंगाई गात होते? गोरखपूरमध्ये ६० मुले ऑक्सीजविना गेली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या, असा सवालही महापौर किशोरी पेडणेकर यांनी विचारला?