मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस पबमध्ये तिचे मित्र-मैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यात मग्न होते. तीही आपल्या मित्र-मैत्रींकडून शुभेच्छा स्विकारत खूश होती. मात्र, अचानक आग लागल्याची माहिती मिळताच धावाधाव आणि पळापळ झाली. मात्र, बाहेर पडण्यासाठीचा मार्ग बंद असल्याने तिच्यासह मित्रांवर काळाचा घाला पडला आणि होत्याचे सर्व नव्हते झाले.
खुशबू मेहता. वय वर्ष २८. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत मोजोस पबमध्ये आली होती. रात्री बारा वाजता पार्टी ऐन रंगात आली असताना अचानक आग लागली. काही कळायच्या आत प्लास्टिक, लागडी बांबूंनी आग घेतली आणि आगीचा भडका उडला. त्यात अधिक भर पडली ती सिलिंडरची. मोठे स्फोट होत आकाशात आग आणि धुराचे लोट पसरले.
दरम्यान, पब मालकाने येथे सुरक्षेबाबतची कोणतीही काळजी घेतली गेली नव्हती हेच दिसून येत आहे. आग लागली तेव्हा दरबाजा बंद होता. त्यामुळे १०० ते १५० लोकांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे आग, धूर आणि गर्दी यामुळे १४ जण आतमध्ये गुदमरुन पडल्याचा अहवाल प्राप्त झालाय. त्यामुळे सुरक्षितेची ऐशी-तैशी पाहायला मिळाली.
आगीचे लोट गुरुवारी रात्री कमला मिलमध्ये काय घडलं, त्याची भीषणता दाखवतायत. दारुचा पूर, ग्लॅमर, म्युझिक या सगळ्यांच्या साथीनं मोजोस बिस्ट्रो लाऊंजमधली पार्टी ऐन रंगात आली होती. कुणाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं. तर कुणाच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. वेळ साधारण रात्री साडे बाराची. त्याचवेळी अचानक रेस्टॉरंटमध्ये आग लागली. कुणाला काही कळण्याच्या आतच आगीनं रौद्ररुप धारण केलं. ओपन एअर रेस्टोरंटमध्ये बांबू आणि प्लॅस्टिकच्या मदतीनं छत तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे पाहता पाहता आग पसरत गेली आणि अख्ख्या लाऊंजला आगीनं कवेत घेतलं.
पाहता पाहता अख्ख्या रेस्टॉरंटचा अक्षरशः कोळसा झाला. रात्री साडे बारा ते सकाळी साडे सहा अशी तब्बल सहा तास आग धुमसत होती. साडे सहाच्या सुमाराला अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं. आग लागली त्या वेळी रेस्टॉरंटमध्ये दीडशेच्या आसपास लोक होते. आग लागल्याचं लक्षात येताच लोक सैरावैरा पळू लागले.
रेस्टॉरंटच्या वॉशरुममध्ये काही मुली होत्या, त्या तिथेच अडकून राहिल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. आग अतिशय वेगानं पसरली. वाट दिसेल तिथे अनेक जण पळत गेले, या इमारतीतल्या काही कर्मचा-यांनी दुस-या एका जिन्यावरुन लोकांना खाली आणलं.
आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या हॉटेलमध्ये आग प्रतिरोधक यंत्रणा होती का?, नेमकं शॉर्ट सर्किट कुठे झालं, याची चौकशी सुरू आहे. पण या रेस्टॉरंटमध्ये प्लॅस्टिक, बांबू आणि लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. त्यामुळे आग भडकल्याचा संशय आहे. त्याचबरोबर या रेस्टॉरंटमध्ये बार टेंडर्सकडून आगीशी खेळ केला जात होता का, पबमध्ये हुक्का दिला जात होता का, याचाही तपास सुरू आहे. आगीप्रकरणी रेस्टॉरंटच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या परिसरात बरीच कॉर्पोरेट ऑफिसेस, रेस्टॉरंट आणि पब्ज आहेत. सुदैवानं ही आग जवळच्या रेस्टॉरंटमध्ये पसरली नाही. आणखी महत्त्वाचं म्हणजे या इमारतीत जेवढी रेस्टॉरंटस आहेत, त्या सगळ्या रेस्टॉरंटसना लागणा-या गॅस सिलिंडरचा साठा याच इमारतीत केला जातो. सुदैवानं आग तिथपर्यंत पसरली नाही. त्यामुळे आणखी होणारी मोठ्ठी हानी टळली.पण वर्षाच्या शेवटी पबमधली आग चटका लावून गेली.