मुंबई : शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांनी पतीच्या पावलावर पाऊल टाकत भारतीय लष्करात रूजू होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणारी परीक्षा त्या अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. कनिका राणे यांना तीन वर्षांचा अगस्त्य नावाचा मुलगा आहे. मात्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यानंतर कनिका राणे यांनी खचून न जाता स्वतःसह कुटुंबीयांना सावरत लष्करात रूजू होण्याचा धैर्याचा निर्णय घेतला.
येत्या काही दिवसांत कनिका यांचे लष्करी प्रशिक्षण सुरू होईल. मेजर कौस्तुभ राणे गेल्यावर्षी ७ ऑगस्टला जम्मू काश्मीरमध्ये गुरेझ सेक्टरमध्ये लढताना शहीद झाले होते.
कनिका राणे या कंम्प्यूटर इंजिनियर आहेत. त्यांनी एमबीएही केले आहे. मेजर कौस्तुभ राणे यांच्या निधनानंतर कनिका यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी परिक्षा दिल्या आणि त्यात त्या उत्तीर्णही झाल्या.
येत्या ऑक्टोबरमध्ये त्यांचे चेन्नईमध्ये प्रशिक्षण सुरु होणार आहे. 11 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्या लष्करात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. कनिका राणे यांच्या या प्रेरणादायी, धाडसी निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.