मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची केंद्र आणि राष्ट्रपतींकडे मागणी

 मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी केंद्र आणि राष्ट्रपतींकडे मागणी

Updated: May 11, 2021, 07:39 PM IST
मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा, मुख्यमंत्र्यांची केंद्र आणि राष्ट्रपतींकडे मागणी title=

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांसोबत राज्यपालांची भेट घेतली. केंद्र व राष्ट्रपतींना विनंती करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. लवकरच पंतप्रधानांची भेट घेवू. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळायला हवा. राज्यांचे अधिकार राज्याकडे असावेत. हा मुद्दा आहे. मराठा समाजाने समजूतदारपणा दाखवला आहे. राज्यपालांना याबाबत पत्र दिलेले आहे, त्याचे उत्तर लवकर मिळावे. राज्यपालही सहमत आहेत. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

याआधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने मराठा समाजात पुन्हा एकदा आक्रमक प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. पण त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजाला शांततेचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

'आरक्षणाचा अधिकार राज्याला नाही तर केंद्राला आहे. त्यामुळे आम्ही केंद्राला आणि राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी ही आपल्या भावना केंद्रापर्यंत पोहोचू, असं सांगितलं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आम्ही लवकरच पंतप्रधानांना भेटू. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने एकमताने निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाला. पण आता जो निर्णय झाला तो जनतेचा आहे. समाजाला न्यायहक्क मिळाला पाहिजे.' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

फडणवीसांनी केलेला कायदा फुलप्रुफ असता तर राज्यपालांना भेटण्याची वेळ आली नसती. असं देखील शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.