मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा १५ दिवसानंतर खातेवाटप जाहीर झाला. सहा मंत्र्यांना हे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र विकासआघाडी सरकारमधील मंत्री जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या खाते बदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. या बदलानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झाले होते. दरम्यान, त्याआधी गृह आणि नगरविकास खात्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होता. त्यामुळे खातेवाटपाचं घोडे अडले होते. अखेर गृह आणि नगरविकास खाते हे शिवसेनेला मिळाले आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात वित्त, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती पडली आहेत. काँग्रेसला महसूल, शालेय शिक्षण ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत.
मंत्रिमंडळ खात्यातील बदल खालीलप्रमाणे
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री. @Jayant_R_Patil यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते श्री.@ChhaganCBhujbal यांच्याकडे देण्यात आले आहे. २/२— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 14, 2019
दरम्यान, करण्यात आलेला खाते विस्तार हा तात्पुरता आहे. त्यात नंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर बदलणार आहे. मात्र, त्याआधीच दोन मंत्र्यांकडील खाते वाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्याकडे आता जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे - गृहमंत्री, नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कामकाज, माजी सैनिक कल्याण
छगन भुजबळ - ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शूल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन
बाळासाहेब थोरात - महसूल, ऊर्जा व अपारंपारिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय
सुभाष देसाई - उद्योग आणि खणीकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा
जयंत पाटील - वित्त आणि नियोजन, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास
नितीन राऊत - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बालविकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण