Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम जवळपास संपला; राज्यात उकाडा झपाट्यानं वाढला

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानाचा आकडा 35 अंशांच्याही पलीकडे. ऑक्टोबर हिटचा त्रास आणखी गंभीर होणार.... पाहा सविस्तर हवामान वृत्त.   

सायली पाटील | Updated: Oct 2, 2024, 08:04 AM IST
Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम जवळपास संपला; राज्यात उकाडा झपाट्यानं वाढला  title=
Maharashtra Weather news less rain more heat mumbai konkan to experiance temprature hike

Maharashtra Weather News : मान्सूनच्या परतीचा प्रवास आता राज्यातून जवळपास अंतिम टप्प्यात असून, धीम्या गतीनं हा मान्सून देशातूनही माघार घेताना दिसणार आहे. दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं देशाच्या पश्चिम बंगाल आणि ओडिशासह केरळच्या किनारपट्टी भागामध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता असेल. उर्वरित देशात मात्र पावसानं विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळेल. इथं पावसानं मुक्काम आटोपता घेतलेला असतानाच तिथं आता महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं वाढताना दिसत आहे. 

राज्यात ऑक्टोबरच्या अगदी पहिल्याच दिवसापासून उष्मा वाढला असून, दुपारच्या वेळेमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण वारे अधिक त्रासदायक सिद्ध होताना दिसतील. तर पुण्यापासून सातारा, सांगलीपर्यंत पावसाच्या हलक्या सरींची बरसात पाहायला मिळेल असा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मात्र आकाश निरभ्र राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

हेसुद्धा वाचा : 'बीफ निर्यात कंपन्यांकडून भाजपाने कोट्यवधींचा पक्षनिधी घेऊन...'; 'राज्यमाता-गोमाता'वरुन ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, मागील दोन दिवसापासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे यामुळे वातावरणातात अचानकच मोठे बदल झाले आहेत. मध्यरात्री थोडा गारवा, सकाळी धुक्याची चादर तर दुपारी कडक उन्हाचा तडाखा असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळते आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसापासून सकाळच्या वेळी धुक्याचा साम्राज्य दिसत आहे. दृश्यमानताही कमी असून वातावरणात उकाडा निर्माण झालेला आहे. इतकंच नव्हे, तर समुद्र किनाऱ्यावरून सुंदर दिसणारी मुंबई धुक्यामुळे दिसेनाशी झाली आहे.

 

सध्याच्या घडीला कोकणाच्या उत्तर भागात आग्रेयेककडून सुरु होणारा कमी दाबाचा एक पट्टा उत्तर प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. ज्यामुळं कोल्हापूर, सातारा आणि लातूर, सांगली इथं हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. पण, हा पाऊस अडचणी वाढवणार नाही. राज्यात मंगळवारी जेऊर इथं 36 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तामपानाची नोंद करण्यात आली. तर,  नागपूर, अकोला, वर्धा इथंही पारा 35 अंशांपलिकडे पोहोचला आहे. किनारपट्टी क्षेत्रामध्ये समुद्रावरून उष्ण वारे वाहत असल्यामुळं हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक भासत आहे. थोडक्यात राज्यात सध्या पावसानं थैमान घातल्यानंतर आता October Heat नं कहर सुरु केला आहे असं म्हणणं गैर नसेल.