अरे अरे रे रे, काय ही दयनीय अवस्था, गुंडांची मांदियाळी भाजपमध्ये - काँग्रेस

'वाल्याचा वाल्मकी करता करता आता भाजपमध्ये गुंडांची मांदियाळी झालेली पाहायला मिळत आहे'

Updated: Apr 10, 2019, 11:11 PM IST
अरे अरे रे रे, काय ही दयनीय अवस्था, गुंडांची मांदियाळी भाजपमध्ये - काँग्रेस title=

मुंबई : अरे अरे रे रे, काय ही दयनिय अवस्था भाजपची. वाल्याचा वाल्मकी करता करता आता भाजपमध्ये गुंडांची मांदियाळी झालेली पाहायला मिळत आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, सांस्कृतिक महाराष्ट्र म्हणतो, त्याची काय अवस्था या सरकारने केली आहे, हे आपण पाहतो आहे. अतीश वाईट वाटते हे पाहून. भाजपची कीव करावासी वाटते. कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. भाजप वाया गेलेला पक्ष आहे. भाजपचे कार्यकर्ते ते सिद्ध करत आहे. जनतेने याची काळजी घेऊन जनताच शेवटची ट्रिटमेंट करेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.

व्यासपीठावर भाजपचा राडा

भाजपचे जे बंदुकबाज मंत्री आहेत, गिरीश महाजन यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला मी पाहतो आहे. त्यानंतर ते महाजन फाईट करताना मी पाहत आहे. काय पाहातेय महाराष्ट्रातील जनता. अत्यंत वाईट. भारतीय जनता पक्षाचे हे जे चित्र दिसतेय ते महाराष्ट्राचे मान खाली घालणारे आहे. हे मंत्री आहेत आमच्याकडे शिस्त असते. पार्टी विथ डिफरंड, असे सांगणारे कुठे गेलेत. हेच काय ते चित्र पाहायचे होते. कायदा आणि सुव्यवस्था कशी चालवणार. मंत्र्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे. मंत्री आहेत की गुंड. मला कळत नाही. आधी बंदुक दाखवत होते. आधी वाघाला पकडायला गेले होते. आता फायटिंग करत आहेत. पोलिसांच्या उपस्थित मंत्री फायटिंग करतो. अती झाले आणि हसू आले, असे म्हण्याची वेळ आली, असे सचिन सावंत म्हणालेत. 

संतप्त कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने

अमळनेर शहरात आज भाजपचा मेळावा सुरू होता. यावेळी मंचावर बसलेले भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे. संतप्त कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने धावले. त्याचवेळी मंचावर उपस्थित असलेले आणि शेजारीच बसलेले भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी बी. एस. पाटील यांना मंचावर मारहाण केली. यानंतर मंचासमोरील जमलेल्या आक्रमक कार्यकर्त्यांनी मंचावरून बी. एस. पाटील यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार झटापट झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यावेळी महाजन यांना धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाजन यांनी काही कार्यकर्त्यांना मंचावरुन ढकलून देताना दिसत आहेत. यावेळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मंचाची उंची मोठी असल्याने पोलिसांनाही मंचावर चढताना कसरत करावी लागली. तोपर्यंत मारहाणीच्यावेळी गोंधळ दिसून आला. दरम्यान, आपल्याला कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याचे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.

 वाद उमेदवारी देण्यावरून 

हा वाद भाजपची उमदेवारी देण्यावरून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या आमदाराला मारहाण झाली, ते बी. एस. पाटील अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून ३ वेळेस निवडून आले आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याआधी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र, पक्षाकडून त्यांना आयत्यावेळी एबी फॉर्म देण्यात आला नाही. त्यांनी तसाच अर्ज सादर केला. दरम्यान, त्यांचा पत्ता कट करुन बी. एस. पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उदय वाघ समर्थकांमध्ये खदखद होती. हा अंतर्गत वाद आज अचानक उफाळला आणि उभ्या महाराष्ट्राला राडा पाहायला मिळाला.

उदय वाघ यांच्याविरोधात टीका

दरम्यान, स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी पारोळा शहरात एक सभा घेतली होती. त्या सभेत बी. एस. पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याविरोधात टीका केली होती. यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी, तसेच भाजपच्या विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना भाजपकडून देण्यात आलेली उमेदवारी नाकारण्यात आली. यावरून हा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.