'सारथी'मधून प्रधान सचिव गुप्ता यांची उचलबांगडी

मराठा संघटनांच्या विरोधानंतर प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांची सारथीमधून उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Updated: Jan 15, 2020, 07:29 PM IST
'सारथी'मधून प्रधान सचिव गुप्ता यांची उचलबांगडी title=
सारथी विरोधात संभाजी राजे यांनी आंदोलन केले होते.

मुंबई : मराठा संघटनांच्या विरोधानंतर प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांची सारथीमधून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी किशोरराजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सारथीमधील अनियमिततेची नवे सचिव किशोरराजे निंबाळकर चौकशी करणार आहे. 

मराठा संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर सारथी संस्थेचा कार्यभार सांभाळणारे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नवे सचिव म्हणून किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सारथीचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गुप्ता यांनी अनेक जीआर काढून सारथीवर निर्बंध लावले होते. त्यामुळं भाजप पुरस्कृत खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा संघटनांनी आंदोलन केलं होतं. सरकारनं गुप्ता यांची उचलबांगडी करून संभाजीराजेंना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.

३ डिसेंबर २०१९ रोजी जीआर काढून सारथीची स्वायत्तता काढून घेतली होती आणि निर्बंध लादले होते. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले होते. याविरोधात संभाजीराजे यांच्यासह मराठा संघटनांनी आंदोलन केलं होते. हे आंदोलन पुण्यात करण्यात आले होते. त्यावेळी राज्य सरकारकडून मंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्ती केली होती. त्यानंतर गुप्ता यांची उचलबांगडी करण्यात आली.

दरम्यान, ११ जानेवारी २०२० रोजी सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची स्वायत्तता रद्द करणारा जीआर मागे घेतल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तसेच वादग्रस्त निर्णय घेणारे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनाही हटवण्याची घोषणाही त्यांनी केली.  त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी सुरु केलेलं उपोषण मागे घेतले होते.  

ठळक घटनाक्रम :

- 'सारथी'चा कार्यभार प्रधान सचिव जे. पी. गुप्तांकडून काढला, 
- सचिव किशोरराजे निंबाळकरांकडे सारथीचा कार्यभार, 
- सारथीमधील अनियमिततेचीही चौकशी होणार,  
- सचिव किशोरराजे निंबाळकर करणार चौकशी, 
- जे. पी. गुप्ता यांनी सारथीवर लावले होते निर्बंध
- याविरोधात संभाजीराजे यांच्यासह मराठा संघटनांनी केलं होतं आंदोलन
- जे. पी. गुप्ता यांना सारथीवरून हटवण्याचं सरकारने संभाजीराजेंना दिलं होतं आश्वासन
- विविध जी. आर. काढून गुप्ता यांनी सारथीवर निर्बंध आणले होते.