दीपक भातूसे, मुंबई : तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पण ही नियुक्ती त्यांनी स्विकारली नव्हती. त्यामुळे मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंची कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली आहे. याआधी नाशिक महापालिका आयुक्तपदावरून मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून महिनाभरापूर्वी बदली करण्यात आली होती. मात्र त्या पदाचा पदभार मुंढे यांनी स्वीकारलाच नव्हता. त्यामुळे शासनाने त्यांची पुन्हा एकदा बदली केली आहे. मात्र यावेळी केलेली बदली कमी महत्त्वाच्या पदावर करण्यात आल्याने ती बदली ते स्विकारतात का हे पाहावं लागेल.
तुकाराम मुंढे हे नाव आज महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यांच्याच परिचयाचं झालं आहे. शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची बदली कोठे ही झाली तरी त्यांच्या कामाची पद्धत कधीच बदलत नाही. ते जेथे ही जातात तेथे कर्मचाऱी आणि राजकारण्यांना देखील धडकी भरते.
तुकाराम मुंढे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील ताडसोना गावात झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले तुकाराम मुंढे यांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या वडिलांनी सर्व प्रयत्न केले. महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते औरंगाबादला गेले. २००५ मध्ये ते UPSC परीक्षेत पास झाले आणि IAS अधिकारी बनले. विशेष म्हणजे ते देशात २० वे आले होते.
तुकाराम मुंढे कामावर रुजू होताच धडाडीने निर्णय घेतात. मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय झाले. लोकं देखील आज त्यांच्या मागे उभे राहताना दिसतात. पण दुर्दैव म्हणजे त्यांची लवकरच बदली होते. तुकाराम मुंढेच्या आतापर्यंत अनेकदा बदल्या झाल्या आहेत.
1. सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007)
2. नांदेडचे उपजिल्हाधिकारी (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007)
3. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जानेवारी 2008 ते मार्च 2009)
4. नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009)
5. वाशिमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जुलै 2009 ते मे 2010)
6. मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (जून 2010 ते जून 2011)
7. जालन्याचे जिल्हाधिकारी (जून 2011 ते ऑगस्ट 2012)
8. मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर 2012 ते नोव्हेंबर 2014)
9. सोलापूरचे जिल्हाधिकारी (नोव्हेंबर 2014 ते एप्रिल 2016)
10. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे 2006 ते मार्च 2017)
11. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ( मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018)
12. नाशिक महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी 2018 ते नोव्हेबर 2018)