मुंबई: राज्य सरकारमुळे कोकणवासीयांच्या प्रवासाचा आणि उत्सवाचा बट्ट्याबोळ झाल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांवर लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला लक्ष्य केले. यावेळी प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, चाकरमानी आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चेष्टाच या सरकारने चालविली आहे. केंद्रांची जी रेल्वे कोकणवासीयांसाठी तयार होती त्यासाठी सुरुवातीला सहमती दिली नाही. आयत्यावेळी विशेष रेल्वे सोडण्याची तयारी सरकारने दाखविली.
... म्हणून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या घटली
एसटीच्या बाबतीतही तेच झाले. एसटी उशिरा सोडली तोपर्यंत ९० टक्के चाकरमानी गावाला पोहचले होते आजही ते पोहचलेले आहेत. खाजगी वाहनांना अवाजवी पैसे देऊन जावे लागले. टोलमाफी केली. १२ ऑगस्टला सांगता गावी जा, १३ ऑगस्टला माफी करता. त्याचबरोबर सांगता चेकिंग करा. शंभर पन्नास रुपयांची टोलमाफी करणार आणि हजार हजार दोन हजार चेकिंगला लावणार. हे कुठल्या प्रकारचे नियोजन आणि कुठल्या प्रकारचा समन्वय आहे, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
मुंबई-गोवा महामार्गावर १९ ते २२ ऑगस्टच्या कालावधीत अवजड वाहनांना बंदी
कोकणवासियांकडे जे दुर्लक्ष आणि हेळसांड झालेली आहे, त्याची किंमत सरकारला चुकवावी लागणार आहे. कारण आता रेल्वे गेली त्याच्यामध्ये फक्त दहा वीस पॅसेंजर होते. ही सुविधा जर वेळेत केली असती, तर कमी पैशात, सुरक्षितरित्या तपासणी करत, चाकरमानी आपल्या गावी जाऊ शकला असता. पण कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे कोकणवासीयांच्या प्रवासाचा आणि उत्सवाचा बट्ट्याबोळ सरकारने केल्याची टीका दरेकर यांनी केली.