नद्यांच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जल आराखड्याला सरकारची मंजुरी

महाराष्ट्र ठरलं पहिलं राज्य

Updated: Jun 22, 2018, 08:16 PM IST

मुंबई : राज्यातील नद्यांच्या खो-यातील पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या जल आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. असा जल आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलंय. मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत प्राथमिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यानिमित्ताने कृष्णा, तापी, नर्मदा, महानदी, पश्चिम वाहिन्या नद्या, गोदावरी खोरे यांच्या पाण्याचं नियोजन करण्याबाबत निर्णय घेतला गेला. राज्याच्या नद्यांच्या खो-यांमध्ये सुमारे 5 हजार टीएमसी पाणी आहे. मात्र यापैकी 1500 टीएमसी पाणी हे अडवले जाते. बाकी 3500 टीएमसी पाणी हे एकतर समुद्रात जाते किंवा दुसऱ्या राज्यात वाहून जाते. तेव्हा खास करून या वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत प्राथमिक जल आराखडा तयार करण्यात आला आहे.