मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, काही खात्यांवरून अजूनही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेय या तिन्ही पक्षात मतभेद असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे खातेवाटप होण्यास उशीर लागत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे सरकारने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आरेतील मेट्रोच्या कारशेड प्रकल्प कामाला स्थगिती दिली आहे. तसेच आरे बचाव आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे आणि रत्नागिरीतील नाणार प्रकल्पविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे ठाकरे सरकारने मागे घेण्याचे आदेश दिलेत.
Breaking news । मुंबई : खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता, खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत, काही खात्यांवरून अजूनही तिन्ही पक्षात मतभेदhttps://t.co/kpo9phDaSR pic.twitter.com/mS6aLsfryb
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 3, 2019
महाराष्ट्रातील खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता आहे. खाते वाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत आहेत. आज संध्याकाळी काँग्रेस नेते मुंबईत परत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्र विकासआघाडीतील तिन्ही पक्षांची बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीचे खातेवाटप होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विकासआघाडीत कुठली खाती कोठल्या पक्षाला द्यायची याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. काही खात्यांवरून अजूनही तीन पक्षात मतभेद आहेत. त्यामुळे आजचे खातेवाटप लांबणीवर पडण्याची शक्यता दुसरीकडे व्यक्त करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. जयंत पाटील की अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यायची यावर एकमत होत नाही. त्यामुळे अंतिम निर्णय हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. तर अजित पवारांसाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. त्यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाबाबत उत्सुकता कायम आहे.