राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप, अजित पवारांकडे 'हे' महत्त्वाचं खातं... पाहा इतर मंत्र्यांकडे काय?

Maharashtra Cabinet Porfolia Allocation: अजित पवार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारची आज पहिली मंत्रीमंडळ बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 4, 2023, 02:06 PM IST
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप, अजित पवारांकडे 'हे' महत्त्वाचं खातं... पाहा इतर मंत्र्यांकडे काय? title=

NCP Minister Department Allocation: अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यावर आज शिंदे फडणवीस पवार सरकारची (Shinde-Fadanvis-Pawar Government) पहिली कॅबिनेट बैठक (Cabinet Meeting) सुरू झालीय. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह (Devendra Fadanvis) ही बैठक होत आहे. बैठकीत राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित आहेत. सातत्यानं एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसलेले दिसत आहेत. राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचंही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधी  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटप समोर आलं आहे. यात अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे अर्थ व वित्त खातं असण्याची शक्यता आहे. तर 

दिलीप वळसे पाटील :- सहकार मंत्री
धनंजय मुंडे :- सांस्कृतिक विभाग
अदिती तटकरे :- महिला व बालविकास मंत्री
हसन मुश्रीफ :- वस्त्र उद्योग
छगन भुजबळ :- अन्न व पुरवठा
संजय बनसोडे :- क्रीडा
अनिल पाटील :- पशु व वैद्यकीय
धर्मराज बाबा आत्राम :- आदिवासी

अजित पवार गटाची बैठक
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी अजित पवारांच्या गटातल्या मंत्र्यांची आज मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांच्या दालनात सर्व मंत्री उपस्थित होते. मंत्रिमंडळात कशी भूमिका मांडायची यावर चर्चा करण्यात आली. त्याआधी अजित पवारांनी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आज मत्रालयात शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना वंदन केलं. अजित पवार यांच्यासोबत 43 आमदार आणि 3 खासदार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयाने केलाय. अजित पवार यांनी आमदारांकडून समर्थनाचं प्रतिज्ञापत्र घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांचं प्रतिज्ञापत्र घेत सह्या घेतल्याचा दावा करण्यात येतोय. अजित पवार यांच्यासोबत असलेल्यांच्या कागदपत्र पूर्ततेची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती त्यांच्या गोटातून बाहेर येतेय. 

दोन्ही गटाचं उद्या शक्तीप्रदर्शन
दरम्यान, उद्या दोन्ही गटांचं मुंबईत शक्तिप्रदर्शन आहे. शरद पवारांनी उद्या राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावलीय. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश आहेत. तसंच अजित पवारांसह गेलेल्या आमदारांनाही परत येण्याच्या अल्टिमेटमचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. तर दुसरीकडे उद्याच अजित पवारांनीही मोठं शक्तिप्रदर्शन करण्याचं ठरवलंय. वांद्रे एमईटी इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मोठे पदाधिकारी यांना या बैठकीचं निमंत्रण आहे. स्वतः अजित पवारांनी या बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलंय. शरद पवारांचा उद्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याचवेळी अजित पवारांनीही भव्य मेळावा घेण्याची हाक दिलीय. त्यामुळे आता कोणत्या गटाकडे खरी ताकद आहे हे उद्याच मुंबईत दिसून येईल. 

शिंदे गटाची खदखद
अजित पवारांसह राष्ट्रावादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता शिंदे गटाची खदखद समोर येऊ लागलीय. नाराज होऊन काय करणार, आता आहे ती परिस्थिती स्वीकारावी लागेल असं म्हणत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी एकप्रकारे नाराजीचीच कबुली दिलीय.