Mumbai Loksabha Election 2024 : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणूक पार परत आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. त्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघात येत्या सोमवारी मतदान पार पडणार आहे. लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी मुंबई पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मुंबईत उद्या सोमवारी (20 मे) 30 हजारांहून अधिक पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. तसेच 3 दंगल नियंत्रण पथकही तैनात केली जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उद्या मुंबईत ठिकठिकाणी मोठा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मुंबईत 2 हजार 752 पोलीस अधिकारी, 27 हजार 460 पोलीस अंमलदार, 6 हजार 200 होमगार्ड, 3 दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) आणि 36 केंद्रीय सुरक्षा दल बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच मुंबई पोलिसांकडून 16 मेपासून आतापर्यंत 8 हजार 088 नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
त्यासोबतच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात आणि मतदान केंद्रात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कोणतीही वायरलेस यंत्रणा नेण्यासही बंद असेल. तसेच मतदान केंद्राच्या परिसरात बॅनर, ध्वनीक्षेपक, मेगोफोनचा वापर करण्यासही बंदी असणार आहे.
याशिवाय मतदान केंद्र परिसरात मतदार आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणतीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सर्व नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून केले जात आहे.
दरम्यान येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यात उत्तर मुंबई मतदारसंघ, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघ, उत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघ, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ, दक्षिण मुंबई मतदारसंघ या सहा मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबईसोबतच महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघातही मतदान पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून जय्यत तयारीही केली जात आहे.