Loksabha 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 17 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. यात काही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळालीय. मुंबईतल्या 4 जागा ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आल्यात. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena Thackeray Group) सांगलीत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केलीय. तर संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे इच्छुक असताना पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना संधी मिळालीय.
सांगलीच्या जागेवरुन मविआत तणाव
उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात काँग्रेस (Congress) निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर केल्यानं आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या विशाल पाटलांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेस करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांनी दिल्लीत खरगे आणि केसी वेणूगोपाल यांची भेट घेतली. संध्याकाळी ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. शिवसेना ठाकरे पक्षानं आघाडीच्या जागावाटपाला गालबोट लावलं, असा थेट घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय.
मविआत कोणताही तिढा नाही?
दुसरीकडे सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कुठलाही तिढा नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीये. काँग्रेसच्या यादीनंतर आम्ही आक्षेप घेतला नव्हता. कोल्हापूरची जागाही काँग्रेसला दिली होती. त्यामुळे सांगलीच्या जागेचा आग्रह धरल्याचा दावा राऊतांनी केलाय.
सांगलीचा आखाडा जिंकणार
सांगली लोकसभेच्या जागेवरुन मविआत वाद सुरु असतानाच सांगलीचा आखाडा आपणच जिंकणार असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलाय. सांगलीतून ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अमोल किर्तीकरांना मुंबई उत्तर पश्चिममधून जाहीर झालेल्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम नाराज आहेत. किर्तिकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्याला सहकार्य न करण्याची घोषणा निरुपम यांनी केलीये..
वंचितने घेतली मविआपासून फारकत
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी मविआशी फारकत घेत तिसऱ्या आघाडीची घोषणा केलीय. वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांची यादी आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर अकोल्यातून स्वत: लढण्याची घोषणा केलीय. प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षानं सांगलीतून उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणाही आंबेडकरांनी केलीय..पत्रकार परिषद घेत तिसऱ्या आघाडीचे स्पष्ट संकेत दिलेत. त्याचवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी पक्षाच्या आघाडीची घोषणा करत 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर मनोज जरांगेंशी आघाडीबाबत चर्चा झाली असून 30 तारखेला जरांगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत, असंही आंबेडकरांनी सांगितलंय..