लॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी'

महाराष्ट्र राज्यातील रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापर २० एप्रिलपासून  सुरु करण्याची तयारी.

Updated: Apr 16, 2020, 04:04 PM IST
लॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी' title=
संग्रहित छाया

दीपक भातुसे / मुंबई : राज्यातील रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापर २० एप्रिलपासून  सुरु करण्याची तयारी राज्याच्या उद्योग विभागाने सुरु केली आहे. राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांमधील परिस्थिती आटोक्यात आहे. अशा जिल्ह्यांमध्ये उद्योग व्यापार सुरू करण्याबाबत योजना आखण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभााष देसाई यांनी सचिवांना दिल्या आहेत. या जिल्ह्यातील व्यापार उद्योग सुरू करताना विशेष काळजी घेतली जाणार आहे.

उद्योग आणि व्यापार सुरु करण्याबाबत विचार होत असला तरी प्रतिबंधात्मक विभागात काहीही उद्योग सुरु करता येणार नाही. जे उद्योग आपल्या परिसरात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करून उद्योग सुरु करायला तयार असतील तर त्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.  मात्र सर्व काळजी घेऊन नियम पाळून उद्योग सुरू करावे लागणार आहे. वाहतुकीची व्यवस्था काही कारखाने स्वतः सुरू करू शकत असतील तर त्यांना परवानगी देण्याबाबत विचार सुरु आहे.

लघु  उद्योजक उद्योग सुरु करायला तयार असतील तर एमआयडीसीमधील मोकळ्या जागेवर राज्य सरकार आणि एमआयडीसी कामगारांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करायला तयार आहे. शेती आधारीत उद्योग सुरू करायला प्राधान्य दिलं  जाणार आहे. ज्या जिल्ह्यांमधील उद्योग, व्यापार सुरू करायचे त्याच्या सीमा सील करण्याचा विचार आहे. म्हणजे या जिल्ह्यात संसर्ग होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे.

कच्चा माल, तयार मालाची वाहतूक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात करण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. अशी वाहतूक करणाऱ्यांनाओळखपत्र दिली जातील तसंच त्यांच्या चाचण्या कराव्या लागतील. इतर माणसांच्या येण्याजाण्यावर बंधन असणार आहेत.

या ठिकाणी बंदी कायम

मुंबई
ठाणे  
नवी मुंबई
कल्याण डोंबिवली
मीरा भाईंदर
वसई-विरार
पनवेल
उल्हासनगर
भिवंडी-निजामपूूर
पुणे
पिंपरी-चिंचवड
नागपूर

- इतर जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करणार
- प्रतिबंधात्मक विभागात काहीही उद्योग सुरु करता येणार नाही
-  जे उद्योग परिसरात कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागणार, त्यांना बाहेर जाता येणार नाही.
- मात्र सर्व काळजी घेऊन नियम पाळूून उद्योग सुरु करावे लागणार
- वाहतुकीची व्यवस्था काही कारखाने स्वतः सुरु करु शकत असतील तर त्यांना परवानगी मिळण्याची शक्यता
- शेती आधारीत उद्योग सुरू करायला प्राधान्य 
-  उद्योग सुरु होणाऱ्या जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचा विचार 
-  कोरोनाचा  जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी सीमा सील करण्याचा विचार
- कच्चा माल, तयार मालाची वाहतूक करणाऱ्यांनाओळखपत्र 
- इतर माणसांच्या येण्याजाण्यावर बंधन असतील, तसेच वैद्यकीय चाचणी

दरम्यान, ऑरेंज झोन - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती तर  ग्रीन झोनमध्ये  - धुळे, नंदूरबार, सोलापूर, वर्धा, परभणी, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे काहीशी सुट मिळण्याची शक्यता आहे.