मुंबई : युती असो, नाहीतर महाआघाडी...लहान पक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्यात. युतीनं जेमतेम १४ जागा मित्रपक्षांना दिल्या, तर आघाडीनं केवळ २५ जागा... त्यामुळं दोन्हीकडचे मित्रपक्ष सध्या नाराज आहेत...ही नाराजी, ही खदखद, हा असंतोष एकट्या जानकरांचा नाही..
भाजपा-शिवसेनेनं आपापसात जागावाटप करताना आपल्या मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.२८८ पैकी जेमतेम १४ जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या. पण त्यातही रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचे आणि जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे बहुसंख्य उमेदवार कमळ चिन्हावरच निवडणूक लढवत आहेत. आता ही मित्रपक्षांची अगतिकता आहे की, भाजपानं केलेली फसवणूक हेच कळत नाहीय.
वर्सोव्यात शिवसंग्रामच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी बंडाचं निशाण फडकवलंय. त्यामुळं जागा छोट्या पक्षांना जागा सोडूनही महायुतीमध्येच सामना रंगलाय. दुसरीकडं महाआघाडीतही काही वेगळी परिस्थिती नाही.
काँग्रेस १४६ जागांवर तर राष्ट्रवादी ११७ जागांवर लढत असून, शेकाप, माकप आणि समाजवादी पार्टी या लहान पक्षांसाठी जेमतेम २५ जागा सोडण्यात आल्यात. विशेष म्हणजे ८ मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबतच मैत्रीपूर्ण लढत रंगणाराय... रायगडमधील पेण आणि अलिबाग मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शेकाप अशी लढत होणाराय..
सत्ता मिळवण्यासाठी विविध समाजघटकांची मतं भाजपा-शिवसेनेला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला हवी असतात. मात्र छोट्या पक्षांना उमेदवारी देण्याची वेळ आली की मात्र हात आखडता घेतला जातो... निदान सत्ता आल्यानंतर तरी त्यांना सत्तेत वाटा मिळेल अशी आशा आहे.