कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देणार - अजित पवार

कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा.

Updated: Jan 24, 2020, 05:07 PM IST
कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देणार - अजित पवार title=
Pic Courtesy : twitter

मुंबई : कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली असून जिल्हा नियोजनाबाबत ही बैठक झाली. जिल्हा विकासासाठी निधी देताना मानवविकास निर्देशांक, लोकसंख्या क्षेत्रफळ, शहर आणि ग्रामीण याबाबी लक्षात घेतल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांसाठी विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यांसाठीही निधी देणार आहोत. त्यासाठी पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभाग अशा विभागवार बैठका घेणार आहोत, असे ते म्हणालेत.

मुंबई शहर आणि उपनगरासाठी तिन्ही पक्षाचे मंत्री आणि एमएमआरडीए, मुंबई महापालिका, नगरविकास अशी एकत्र बैठक घेऊन त्यातून काय करता येईल याची चर्चा केली आहे. पूर्वी देताना कोणतेही नियोजन नसायचे. काही जिल्ह्यांना जास्त पैसे मिळाले काही जिल्ह्यांना अगदीच कमी निधी मिळाला. पण मी आता त्याबाबत बोलणार नाही, असे ते म्हणालेत.

मुंबईसाठी वेगळा विचार

मुंबईत सुंदर हेरिटेज वास्तू आहेत. या वास्तू तशाच ठेवून काय नवीन करता येईल, यावर विचार करण्यात आला. वास्तुविशारद आभा, हाफिज कॉन्ट्रेक्टर यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. हेरिटेज टच तसा ठेवून काय करता येईल याबाबत चर्चा केली. सांताक्रुझ मुंबई विद्यापीठात इमारती बांधल्या आहेत, त्या नीट बांधलेल्या नाहीत, असे यावेळी अजित पवार म्हणालेत. 

दरम्यान, शिक्षणाचे वातावरण तयार करण्याचे काम आम्ही करतोय, तशा सूचना दिल्या आहेत. दक्षिण मुंबईत हेरिटेज वॉकची संकल्पना आमच्यासमोर आली आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.