कोरोना नियमांच्या सक्तीने लोक संतापले, 'या' जिल्ह्यात निर्णय एका दिवसात मागे

 या निर्णय नागरिकांच्या संतापाला कारणीभूत 

Updated: Apr 7, 2021, 12:13 PM IST
कोरोना नियमांच्या सक्तीने लोक संतापले, 'या' जिल्ह्यात निर्णय एका दिवसात मागे title=

कोल्हापूर : राज्यासह देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढतेय. यासाठी राज्यशासनाने नियम अधिक कठोर केले आहेत. रात्री 8 नंतर संचारबंदी आणि शुक्रवार ते रविवार पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. दरम्यान काही दिवसांपुर्वी राज्यातील जिल्ह्यांमध्ये देखील कठोर निर्णय घेण्यास सुरुवात झाली होती. या निर्णय नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत होते. कोरोना नियमांशी संबंधित असाच एक निर्णय कोल्हापूरमध्ये देखील घेण्यात आला होता. पण नागरिकांचा रोष पाहता हा निर्णय मागे घेतोय हे जिल्हा प्रशासनाला जाहीर करावं लागलं. काय होता हा निर्णय हे पाहुया. 

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जनतेला एक आदेश देण्यात आला होता. यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सांगण्यात आल्या होत्या. यानुसार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच जिल्ह्याअंतर्गत एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली होती. तसेच त्यांचे अलगीकरण देखील करण्याचा निर्णय देण्यात आला होता. 6 एप्रिल रोजी हा आदेश काढण्यात आला होता. 

पण नागरिकांचा रोष आणि होणारी गैरसोय पाहता हा निर्णय मागे घेत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड 19 संसर्गाबाबत शासनाच्या सध्याच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी आणि विलगीकरण कार्यवाही सुरु राहीलं असेही स्पष्ट करण्यात आले.