मुंबई : कोरोनाचा उद्रेक (Maharashtra Corona State) महाराष्ट्रात वाढला आहे. असं असतानाही नागरिकांमध्ये कोरोनाचं गांभीर्य कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांचा निष्काळजीपणाच भोवला असल्याचं समोर येत आहे. नागरिक कोरोनाचे नियम सर्रास मोडताना दिसत आहेत. मुंबईतील खारमध्ये (Khar family) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही बाहेरगावी जाण्याची धडपड करणाऱ्या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Khar family booked for forging Covid report to take a flight to Rajasthan)
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असतानाही खार परिसरातील दाम्पत्याने बनावट अहवाल सादर करून बाहेरगावी जाण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी मंगळवारी या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या एच वेस्ट वॉर्डमध्ये कोविड १९ सेलमध्ये कार्यरत असलेले ३६ वर्षीय डॉक्टर ओमप्रकाश जैस्वाल यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. २६ फेब्रुवारी रोजी खारमधील दाम्पत्य आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीने थायरोकेअर लॅबरोटरीजमध्ये कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत पालिकेला माहिती मिळताच, २७ फेब्रुवारी रोजी त्यांनी संबंधित कुटुंबीयांना कॉल करून अहवालाबाबत चौकशी केली.
मात्र तेव्हा त्यांनी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगत, तो व्हॉट्सॲपवर पाठवला. तसेच जयपूरची फ्लाईट असल्याने आपण विलेपार्ले विमानतळावर असल्याचे सांगितले. मात्र अहवालाबाबत संभ्रम निर्माण झाल्याने जैस्वाल यांनी त्यांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाबाधित असतानाही त्यांनी खार ते विलेपार्ले विमानतळ असा प्रवास केला. शिवाय बनावट अहवाल सादर केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या एच/ पश्चिम विभागातर्फे खार पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाबाधित नसल्याचा खोटा रिपोर्ट तयार करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाग्रस्त असतानाही रिपोर्टमध्ये फेरफार करून कोरोनाग्रस्त नसल्याचा खोटा रिपोर्ट तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ५३ वर्षीय लखमीचंद थवानी यांनी रिपोर्टमध्ये फेरफार केली होती. मुंबईच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कोव्हिडं पोझटिव्ह ला कोव्हिड निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे.