मुंबई : येत्या शनिवारी ४ डिसेंबर रोजी कार्तिक अमावास्येच्या दिवशी यावर्षातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतू हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. खग्रास सूर्यग्रहण जेथे दिसेल तेथे जप, तपश्चर्या, उपासना-पाठ, दान-दानाचे सूतक इत्यादी कल्पना असतील, इतर देशांमध्ये होणार नाहीत.
या सूर्यग्रहणाविषयी अधिक माहिती देतांना श्री. सोमण म्हणाले की, या सूर्यग्रहणाचा प्रारंभ पृथ्वीवर सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी होणार आहे. हे सूर्यग्रहण दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपणार आहे. हे सूर्यग्रहण आफ्रिकेचा दक्षिण भाग, अमेरिकेचा दक्षिणेकडील प्रदेश, आस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, अटलांटिक, प्रशांत, हिदीमहासागर आणि अंटार्क्टिक प्रदेश येथून दिसणार आहे.
भारतातून दिसणारे सूर्यग्रहण पुढच्यावर्षी मंगळवार, दि. २५ आक्टोबर २०२२ रोजी होणार असल्याचेही श्री. दा.कृ. सोमण यांनी सांगितले. पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध चंद्र दाखल झाल्यावर सूर्यग्रहण पाहायला मिळतं. यामुळे पृथ्वीवर चंद्राची छाया पडलेली दिसून येते. यामुळे पृथ्वीवरच्या अनेक भागांत सूर्यकिरण पूर्णत: किंवा आंशिक स्वरुपात पोहचू शकत नाहीत.
भारतात वर्षभरात ग्रहण नसल्यामुळे त्याचा प्रभाव राशींवर कमी प्रमाणात दिसून येईल. खग्रास चंद्रग्रहण 26 मे रोजी भारतात दिसले. आता 25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण दिसणार आहे.
भारतात हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नसलं तरी ऑनलाईन तुम्ही हे दृश्यं पाहू शकाल. अंटार्टिकाच्या 'युनियन ग्लेशियर'हून नासाकडून या सूर्यग्रहणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. नासाची वेबसाईट (nasa.gov/live) आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाल हे सूर्यग्रहण पाहता येईल. भारतीय वेळेनुसार, ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून याचं प्रसारण सुरू होईल.
यापुढचं संपूर्ण सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी पाहायला मिळेल. कॅनडा, मॅक्सिको, अमेरिकासहीत जगातील वेगवेगळ्या भागांत हे सूर्यग्रहण दिसू शकेल. महत्वाची बाब म्हणजे युरोपत या संपूर्ण शतकात एकही सूर्यग्रहण दिसू शकणार नाही.